"बंडखोर आमदारांनी कधी या पर्यायाचा विचार केला आहे का?"; शिवसेनेचा शिंदे गटाला सवाल

Shiv Sena हिंदुत्व म्हणजे धर्मांधता किंवा दंगलींचा माहोल निर्माण करून निवडणुका जिंकायच्या असे नसते बाबांनो"; नुपूर शर्मा प्रकरणाचं उदाहरण देत आमदारांना सुनावलं
"बंडखोर आमदारांनी कधी या पर्यायाचा विचार केला आहे का?"; शिवसेनेचा शिंदे गटाला सवाल

शिवसेनेनं पुन्हा बंडखोर आमदारांना सुनावलंय. बंडखोरी करणाऱ्या आमदारांना नुपूर शर्मा प्रकरणात भाजपनं घेतलेल्या भूमिकेचं उदाहरण देत शिवसेनेनं बंडखोर आमदारांना हिंदुत्वावरून उलट सवाल केलाय. त्याचबरोबर मातोश्रीचे दरवाजे सन्मानाने उघडले तर परत येऊ, असं म्हणणाऱ्या आमदारांचीही कानउघाडणी सामनातून करण्यात आलीये.

शिवसेनेचे 'सामना'तून बंडखोरांवर टीकेचे बाण

"शिवसेनेत जे काही कथित बंड झाले त्याची पेरणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असतानाच झाली होती, असा गौप्यस्फोट त्यांच्यातल्याच एकाने केला. भाजप सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून सरकार पाडायचेच या ईर्षेने कसा कामास लागला होता तेच या आमदारांच्या वक्तव्याने स्पष्ट होते. यापैकी आणखी एका सन्माननीय बंडखोर आमदाराने स्पष्ट केले, ‘मातोश्रीचे दरवाजे सन्मानाने उघडले तर आम्ही आनंदाने परत येऊ!’ आता दरवाजे सन्मानाने उघडायचे म्हणजे नक्की कसे काय करायचे? ‘मातोश्री’ची परंपरा व संस्कार असा आहे की तेथे सगळ्यांचाच सन्मान होतो. दरवाजे उघडेच असतात व दाराबाहेरील चपलांचे ढिगारे हेच ‘मातोश्री’चे वैभव आणि श्रीमंती आहे," असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

"अलीकडे तर पन्नास ‘मोठे खोके’ भरतील इतक्या चपलांचा ढिगारा मिनिटागणिक ‘मातोश्री’वर होत असतो. हे जे काही कथित बंड वगैरे झाले त्याच्या पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे एका तळमळीने आवाहन करीत आहेत की, ‘शिवसेना हे कुटुंब आहे. मातोश्री तुमचे हक्काचे घर आहे. परत फिरा. घरी या!’ यापेक्षा सन्मानाने बोलविण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे काय?," प्रश्न शिवसेनेनं बंडखोर आमदारांना केलाय.

एकनाथ शिंदेंना जुन्या भूमिकेची दिली आठवण

"भाजपच्या फडणवीस सरकारात असताना आजच्या मुख्यमंत्र्यांनी ‘शिवसैनिकांवर अत्याचार होत आहेत, शिवसेनेच्या मंत्र्यांना मान-सन्मान मिळत नाही. निधीवाटपात वाटा नाही,’ असा जाहीर त्रागा करून मंत्रीपदाचा राजीनामाच दिला होता. तेव्हा भाजपला जी दूषणे दिली तीच आता इतरांना दिली जात आहेत," असं म्हणत शिवसेनेनं एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला आहे.

"मुळात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले ते महाराष्ट्र व जनतेच्या कल्याणावर आधारित किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर. गेल्या अडीच वर्षांत हिंदुत्वाशी शिवसेनेने किंवा नेत्यांनी तडजोड केल्याचे एकतरी उदाहरण दाखवावे. ‘हिंदुत्व’ म्हणजे धर्मांधता किंवा दंगलींचा माहोल निर्माण करून निवडणुका जिंकायच्या असे नसते बाबांनो! पैगंबर साहेबांच्याबाबत अपशब्द उच्चारल्यावर भाजपलाही नुपूर शर्मांपासून हात झटकावे लागले. तिला पक्षातून काढावे लागले. येथे भाजपने हिंदुत्व धोक्यात आल्याची आरोळी ठोकली नाही. राज्य हे अशाच समन्वयाने चालवायचे असते," अशा शब्दात शिवसेनेनं बंडखोर आमदारांना सुनावलं आहे.

वाजयपेयींच्या सरकारचं उदाहरण

"तिकडे प. बंगालात ‘सेक्युलर’ ममता बॅनर्जी यांनी त्यांच्याच खासदार महुआ मोईत्रांवर कारवाई केली. का? तर महुआ यांनी कालीमातेवर एक टिप्पणी केल्याने हिंदूंच्या भावना भडकल्याची बोंब भाजपने मारली. ममतांनी श्रीमती मोईत्रांवर कारवाई केली. या कारवाईमुळेही तृणमूल काँग्रेसचा ‘सेक्युलर’वाद धोक्यात आला नाही. देशभक्ती म्हणजे सडकछाप धर्मांधतेचे ओंगळवाणे प्रदर्शन नाही. सगळ्यांना सांभाळून राज्य व देश पुढे न्यायचा असतो व आघाडीचे सरकार चालवताना कसरती कराव्या लागतात."

"अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’चे सरकार असताना राममंदिर, समान नागरी कायदा, 370 कलम यांसारखे हिंदुत्वाचे विषय काही काळ गुंडाळून ठेवावे लागले होते, पण मोदींचे पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर येताच राममंदिर, 370 कलमाचे विषय मार्गी लागले. आपल्याला आपल्या मतांप्रमाणे राज्य चालवायचे असेल व निर्णय अमलात आणायचे असतील तर स्वतःचे बहुमताचे सरकार निवडून आणणे हाच एकमेव पर्याय ठरतो."

स्वबळावर निवडणूक लढवण्यावरून टोला

"स्वतःस बंडखोर म्हणवून घेणाऱ्या आमदारांनी कधी या पर्यायाचा विचार केला आहे काय? ‘चला साहेब, आता पुरे झाले. हे महाविकास आघाडीचे सरकार थांबवा. आपण बाहेर पडू व स्वबळावर हिंदुत्वाचे सरकार आणू. तोपर्यंत वाटल्यास विरोधी पक्षात बसू!’ अशी भूमिका या तथाकथित हिंदुत्ववादी बंडखोर आमदारांनी घेतली असती तर त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकऱ्यांनी ‘व्वा रे माझ्या मर्दांनो!’ असे बोलून पाठच थोपटली असती. पण यापैकी काहीच घडले नाही. उलट सत्तेतून फक्त सत्तेकडे हाच मार्ग त्यांनी निवडला.

"इकडे त्यांना महाविकास आघाडीचा जाच होता तरी आता या गटास भाजपच्या तालावरच नाचायचे आहे. भाजपला शिवसेनेचा पराभव करायचा नसून शिवसेना संपवायची आहे व पाहुण्याच्या चपलेने विंचू मारायचा आहे. पण विंचवाचा डंख व विष जहाल असते. इंगळी डसली की काय होते ते डोंगर-झुडुपातले राजकारण करणाऱ्यांना समजते. ‘मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने उघडेच असतात व बाहेर चपलांचे ढिगारे वाढतच आहेत. या वैभवाशी कसा सामना करणार?," असा उलट सवाल शिवसेनेनं बंडखोर आमदारांना केलाय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in