'फडणवीसांना आज मजा वाटतेय, पण हाच खेळ भविष्यात त्यांच्यावर उलटू शकतो', शिवसेनेचा इशारा

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी पकडून नवाब मलिक यांच्याशी वैयक्तिक वैर पुढे नेले आहे. असा आरोप शिवसेनेने केला आहे.
'फडणवीसांना आज मजा वाटतेय, पण हाच खेळ भविष्यात त्यांच्यावर उलटू शकतो', शिवसेनेचा इशारा
shiv sena criticized devendra fadnavis over nawab malik case dawood ibrahim saamana editorial

मुंबई: 'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्याशी वैयक्तिक वैर घेतले आहे व केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी पकडून ते वैयक्तिक वैर पुढे नेत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांतील अधिकाऱ्यांना ‘फतवे’ देण्याचे काम फडणवीस करतात यात त्यांना आज मजा वाटत आहे पण हाच खेळ भविष्यात त्यांच्यावर उलटू शकतो.' असा इशाराच शिवसेनेने आपलं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून फडणवीसांना दिला आहे.

नवाब मलिक यांच्यावरील कारवाई ही वैयक्तिक सूडातूनच करण्यात आली. मलिक यांनी अशा काही प्रकरणांना हात घातला की, त्यामुळे भाजपची वाट बिकट झाली होती म्हणून त्यांच्यावर केंद्रीय तापस यंत्रणांनी कारवाई केली. असा आरोप आता शिवसेनेने केला आहे.

'सामना'च्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:

 • भाजप किंवा केंद्रीय तपास यंत्रणा म्हणते ती ‘डी’ गँग आहे कोठे? ‘डी’ गँग ही राजकीय विरोधकांना बदनाम करण्यापुरतीच उरली आहे हे स्पष्ट झाले आहे. नवाब मलिक यांच्यावरील कारवाई ही वैयक्तिक सूडातूनच करण्यात आली. मलिक यांनी अशा काही प्रकरणांना हात घातला की, त्यामुळे भाजपची वाट बिकट झाली.

 • अनिल देशमुख व इतरांच्या बाबतीत तेच घडले, पण याच पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा काम करीत राहिल्या तर त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. फडणवीस किंवा भाजपच्या फतव्यांनी कारवाया करणे यात ज्यांना मर्दुमकी वाटते ते स्वतःसाठी खड्डा खणत आहेत.

 • भारतीय जनता पक्षाला जळी, स्थळी, काष्ठ, पाषाणी फक्त दाऊदच दिसतो आहे. विरोधकांना बदनाम करायचे असेल किंवा विरोधकांना अडकवायचे असेल तर त्यांचा संबंध दाऊदशी जोडून मोकळे व्हायचे, हे त्यांचे धोरणच आहे. भारतीय जनता पक्षाचे सांगायचे तर दाऊद हे त्यांच्यासाठी प्रिय पात्रच बनले आहे.

 • विरोधाची वैचारिक पातळी घसरल्याने भाजपचे ‘‘दाऊद दाऊद’’ सुरू आहे. नवाब मलिक यांचे ‘डी’ गँगशी संबंध असल्याचे आरोपपत्र ‘ईडी’ने न्यायालयात सादर केले आहे. पाच हजार पानांचे हे आरोपपत्र आहे. त्या आरोपपत्रात किती तथ्य आहे, याचा फैसला लागायचा तेव्हा लागेल, पण नवाब मलिक यांना अडकविण्यासाठी ‘डी’ गँग वगैरेंचा संदर्भ जोडला जात आहे.

 • शरद पवार हे देशाचे संरक्षणमंत्री असताना त्यांच्यावर गोपीनाथ मुंडे वगैरे लोकांनी दाऊदसंदर्भातले आरोप करून खळबळ उडवली, पण नंतर गृहखाते मुंडय़ांकडे येऊनही या आरोपांची चौकशी झाली नाही व तथ्यही समोर आणले गेले नाही. उलट विधानसभेत मुंडे म्हणाले होते की, ‘‘विरोधकांना बदनाम आणि नामोहरम करण्यासाठी असे आरोप करावे लागतात.’’ नवाब मलिक व महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांच्या बाबतीत हे असेच आरोप गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत.

 • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्याशी वैयक्तिक वैर घेतले आहे व केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी पकडून ते वैयक्तिक वैर पुढे नेत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांतील अधिकाऱयांना ‘फतवे’ देण्याचे काम श्री. फडणवीस करतात, ही त्यांना आज मजा वाटत आहे, पण हाच खेळ भविष्यात त्यांच्यावर उलटू शकतो.

 • फडणवीस हे पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते व गृहखाते त्यांच्याच ताब्यात होते. नवाब मलिक यांचे ‘डी’ गँगशी संबंध होते हे त्यांना तेव्हा का दिसले नाही व ‘डी’ गँगची पाळेमुळे फडणवीस यांनी तेव्हाच का खणून काढली नाहीत? मलिक यांचे दाऊद वगैरेंशी संबंध होते तर फडणवीस यांनी ते रॅकेट उद्ध्वस्त करायला हवे होते. त्यामुळे फडणवीस हेसुद्धा तितकेच अपराधी आहेत.

 • नवाब मलिक व कथित ‘डी’ गँगचे संबंध दाखविण्यात आले ते काही आजचे नाहीत. मग तेव्हा हे लोक काय झोपले होते? फडणवीस यांच्या विरोधात नवाब मलिक यांनी हल्लाबोल करताच केंद्रीय तपास यंत्रणांचा पद्धतशीर वापर करण्यात आला व त्यास ‘डी’ गँगचा संदर्भ दिला. दाऊद नक्की कुठे आहे हे आता रहस्यच आहे. दाऊद देशासाठी इतका खतरनाक आहे व त्याचे अंडरवर्ल्डचे जाळे असे पसरले असेल तर केंद्र सरकारचे गृहखाते काय करतेय?

 • दाऊद पाकिस्तानात आहे व त्याचा ठावठिकाणा केंद्रीय गुप्तचर खात्यास माहीत असायला हवा. त्याच्या ठिकाणावर हल्ला करून हिंदुस्थानचा हा शत्रू कायमचा संपवायला हवा व तसे करण्यापासून केंद्र सरकारला कोणी रोखले आहे?

 • अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनला मारले तसे दाऊदला मारा, पण दाऊद जिवंत आहे की मेलाय हे येथील लोकांना माहीत नाही, पण तरीही दाऊदच्या नावाने त्यांची जपजाप कायम सुरू असते. मुंबईतील अंडरवर्ल्ड व्यवस्थेचा अभ्यास भारतीय जनता पक्षाने काळजीपूर्वक केला पाहिजे.

 • केंद्रीय तपास यंत्रणांना मारून मुटकून वैद्यबुवा करण्याचे काम केले जात आहे. मुंबईतील अंडरवर्ल्डचा बीमोड पोलिसांनी केला आहे. दाऊद ही कथा किंवा दंतकथा आज उरलेली नाही, पण भाजप व केंद्रीय तपास यंत्रणा दाऊदच्या नावाने उद्योग करून दाऊदची विरासत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात. यात त्यांचा स्वार्थ आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in