
वसंत मोरे, इंदापूर: 'राष्ट्रपती नियुक्त माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर शिवसेनेने मोठा अन्याय केलेला आहे.' अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज (31 मे, मंगळवारी) रोजी इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. तेव्हा त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
'मागील अनेक दिवसापासून संभाजीराजे यांनी अपक्ष लढण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यांनी जर भाजपकडे प्रयत्न केला असता तर ते भाजपचे उमेदवार राहिले असते. मात्र. ते स्व:ताच स्वबळावर लढण्याचे सांगत होते. यावेळी त्यांना दिलेला शब्द शिवसेनेने पाळला नाही. तर महाविकासआघाडी नेत्यांना त्यांना धोका दिलेला आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आरोप करू नयेत. भाजपाचा याच्याशी काहीही संबंध नाही.' असं म्हणत रामदास आठवले यांनी शिवसेनेलाच टार्गेट केलं आहे.
'हिंमत असेल तर काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा'
दरम्यान, याचवेळी बोलताना रामदास आठवलेंनी काँग्रेसला देखील चुचकारण्याचा प्रयत्न केला. 'काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते की, राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांचे तसे मत असेल तर त्यांनी महाविकास आघाडीत न राहता हिंमत असेल तर पाठिंबा काढून घ्यावा.'
'असं आमचं नाना पटोले आणि काँग्रेसला आव्हान आहे. काँग्रेसने पाठिंबा काढला की, भाजप आम्ही सरकार करायला तयार आहोत. आमच्याकडे 105 आमदार असून अपक्षांचा देखील आम्हाला पाठिंबा आहे. देवेंद्र फडणीस हे मुख्यमंत्रीपदासाठी खंबीर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेपेक्षा फडणवीस हे कोणताही निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. त्यांचे काम देखील ठाकरेंपेक्षा उत्तम होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी फडणवीस मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे.' असंही आठवले यावेळी म्हणाले.
राज्यात सत्ता बदल झाल्यापासून रामदास आठवले हे सातत्याने शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करत आहे. तसेच आधी ते महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही याबाबतही भाष्य करत होते. पण आता जवळजवळ अडीच वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर ते महाविकास आघाडीचं सरकारवर सातत्याने टीका करत आहेत.
याआधी त्यांनी शिवसेनेला असा सल्लाही दिला होती की, अडीच वर्ष पूर्ण होत आल्याने उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडावं आणि भाजपसोबत युती करुन सत्ता स्थापन करावी आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवावं.
मात्र, असं असलं तरीही शिवसेनेने त्यांच्या या मतांकडे किंवा प्रस्तावांकडे कधीही गांभीर्याने पाहिलं नाही. पण तरीही आठवले हे सातत्याने याबाबात काही ना काही विधान हे करतच असतात.