
विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागले. भाजपने राज्यसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करत महाविकास आघाडीला पुन्हा जोरदार धक्का दिला. भाजपने लागोपाठ दोन निवडणुकीत आघाडीला रणनीतीने लोळवल्यानंतर आता पुढे काय होणार याकडे लक्ष लागलेलं असतानाच राज्यात नवा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या निकालाने राज्यात राजकीय अस्थिरतेच्या चर्चांना उधाण आलंय. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीचा निकाल रात्रीपर्यंत रंगला. एकीकडे निकालानंतर जल्लोष आणि प्रतिक्रिया येत असताना दुसरीकडे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी गुजरातच्या दिशेनं प्रयाण केलं.
एकनाथ शिंदे रात्रीच गुजरातमधील सुरतला रवाना झाले. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदेसोबत १३ आमदारही आहेत. सध्या एकनाथ शिंदे हे आमदारांसह सुरतमधील ले मेरिडिअन हॉटेलमध्ये असून, २१ लोकांसाठी रुम बुक करण्यात आल्या आहेत.
एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्याची माहिती मंगळवारी सकाळी आली. मात्र, एकनाथ शिंदे आमदारांसह मध्यरात्रीच सुरतमध्ये दाखल झाल्याची माहिती आता समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री २ वाजता सुरत पोलिसांच्या कंट्रोल रुमला एक फोन आला.
फोनवरून ले मेरिडिअन हॉटेलची सुरक्षा वाढवण्याची माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील आमदार हॉटेलमध्ये येत आहेत. त्यामुळे हॉटेलची सुरक्षा वाढवायची आहे, असं कंट्रोल रुमला सांगण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी रात्रीच हॉटेलची सुरक्षा वाढवली.
रात्री हॉटेलच्या परिसरात बॅरिकेट्स लावण्यात आले. हॉटेलपासून ५०० मीटर परिसरात कुणालाही येण्या-जाण्यास परवानगी नाही. आतापर्यंत हॉटेलमध्ये कोणताही भाजप नेता आलेला नाही. मात्र, रात्रीपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार हॉटेलमध्येच आहे.
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काही आमदारही असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे यांच्यासोबत नक्की किती आमदार आहेत, याची निश्चित माहिती नसली, तरी हॉटेलमध्ये २१ लोकांच्या नावांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे यातील आमदार किती आहेत, याची निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.
एकनाथ शिंदे घेणार पत्रकार परिषद?
सुरतमधील ले मेरिडिअन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्या भेटीला अद्याप कुणीही गेलेलं नाही. त्याचबरोबर आज मुंबई होणाऱ्या शिवसेना आमदारांच्या बैठकीला एकनाथ शिंदे हजर राहणार की नाही, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे हे याच हॉटेलमध्ये दुपारी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे.