
मुंबई: 'मिस्टर फडणवीस नुसती कट-कारस्थानं करुन आणि कपट-कारस्थानं करुन राज्य चालवता येणार नाही. फार घमेंड करु नका. अगदी स्पष्ट सांगायचं तर.. तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है!', अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे.
राज्यसभा निवडणुकीत भाजपने अनपेक्षितरित्या तिसरीही जागा जिंकली. त्यामुळे हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीनंतर भाजप नेते शिवसेनेवर काही दिवसांपासून तोंडसुख घेत आहेत. ज्याला आता संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे. ते शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
'तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है!'
'मी काही दिवसांपूर्वी एक विधान केलं होतं. ज्यावर भाजपने कठोर टीका केली. श्रीलंकेत जेव्हा जनता रस्त्यावर उतरली तेव्हा म्हटलं की, या देशाची स्थिती सुद्धा श्रीलंकेसारखी व्हायला वेळ लागणार नाही. पाहा एक महिन्यात या देशातील तरुण वर्ग, बेरोजगार, सुशिक्षित रस्त्यावर उतरलेला आहे. त्यांना रोखण्यासाठी अनेक राज्यात सैन्याला आणावं लागलं आहे. बिहारमध्ये आज सैन्य आलेलं आहे. याला राज्य करणं म्हणत नाही.' असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपच्या अग्निपथ योजनेवर टीका केली आहे.
'फार घमेंड आली आहे काही लोकांना, राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. पार पडल्या ठीक आहे एखादी जागा इकडे-तिकडे होत असते. पण मी इतकंच सांगतो की, एक जागा जिंकली म्हणजे तुम्ही जग जिकलं असं नाही. या राज्याची सूत्रं शिवसेनेकडेच असतील. फार घमेंड करु नका. अगदी स्पष्ट सांगायचं तर.. तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है!' असा शेर म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
'राज्य कसं करायंच हे पाहायचं असेल तर महाराष्ट्रात या. मिस्टर फडणवीस नुसती कट-कारस्थानं करुन आणि कपट-कारस्थानं करुन राज्य चालवता येणार नाही. हे राज्य सगळ्यांना एकत्र घेऊन चालवावं लागेल. ती क्षमता फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आहे.' असं म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर थेट टीका केली आहे.
'शिवसेनेच्या अंगावर काही किरकोळ लोकं खूप सोडले गेले. राणा, बाणा, काणा.. पण शिवसेनेचा बाणा स्वाभिमानाचा बाणा.. हा सगळ्यांच्या छाताडावर पाय देऊन उभा आहे. हे सगळे लोक आज जे टिरटिर आणि पिरपिर करतायेत ते तुम्हाला दिसतील भविष्यात शिवसेनेच्या पायाशी.' असा दावाही संजय राऊतांनी केला आहे.