
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दोनपैकी कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं यावरून दोन गट पडल्याचं दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदारांची बैठक पार पडली असून, या बैठकीनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भूमिका मांडली आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेत बंड उफाळून आल्यानं पक्षात उभी फूट पडली आहे. आता शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार की, यशवंत सिन्हा यांना?, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. यासंदर्भात शिवसेना खासदारांची बैठक झाली असून, त्यात मुर्म यांना पाठिंबा देण्याचा आग्रह खासदारांनी धरल्याची माहिती आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबरोबरच इतर मुद्द्यांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले, 'शिवसैनिक नेहमी पक्षप्रमुखांचा आदेश पाळतात. अशा विषयांवर बैठक होते. शिवसेनाप्रमुख असतानाही व्हायच्या. सहकाऱ्यांची मतं जाणून घेऊन निर्णय घेतले जात. आताही उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात देशात जे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. द्रौपदी मुर्मू यावर चर्चा झाली."
"प्रत्येकाची मतं समजून घेतली आणि यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यायचा निर्णय झालाय म्हणजे तो भाजपला पाठिंबा दिलाय असं होतं नाही. यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षाचे दुसरे उमेदवार आहेत. त्यांनाही आमच्या सद्भावना आहेत."
"या देशात विरोधी पक्ष मजबूत असायला पाहिजे. एकी टिकायला पाहिजे, हे जरी खरं असलं, तरी अनेकदा अशा निवडणुकांमध्ये लोकभावना काय आहे हे पाहून निर्णय घ्यावा लागतो. यापूर्वी सुद्धा प्रतिभाताई पाटील यांना आम्ही पाठिंबा दिलाय. एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नव्हता. कारण प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी महिला होत्या. आम्ही प्रणव मुखर्जींनाही पाठिंबा दिला आहे. आम्ही एनडीएमध्ये असताना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेला अशा प्रकारचे निर्णय घेण्याची परंपरा आहे," असं सांगत संजय राऊत यांनी शिवसेना मुर्मू यांना पाठिंबा देईल असे संकेत अप्रत्यक्षपणे दिले आहेत.
नाराज असल्यामुळे बैठकीतून निघून गेल्याच्या चर्चेबद्दलही संजय राऊत यांनी खुलासा केला. "बैठक १२ वाजेपासून ते ४ वाजेपर्यंत चालली. बैठक संपल्यानंतर मी निघून गेलो. मला सामनामध्ये काम होतं. मला काम आहेत खूप. मी कुठे रेंगाळत बसत नाही. मी उठून गेल्याच्या बातम्या ज्यांनी दिल्या, ते मुर्ख लोक आहेत. नक्की काय चाललंय, हे त्यांना कळत नाही. अशा अफवा पसरवणं, खोट्या बातम्या पसरवणं यासाठी एक यंत्रणा काम करते," असं राऊत म्हणाले.
काही खासदार फुटण्याच्या तयारीत असल्याच्या वृत्तावर संजय राऊत म्हणाले, "अशा बातम्या बाहेर पसरल्या आहेत. काल बहुसंख्य खासदार उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव नव्हते. त्याला आम्ही काय करणार. भावना गवळीही नव्हत्या. बाकी बहुसंख्य खासदार उपस्थित होते," असं यांनी सांगितलं.