
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर आपली बाजू मांडली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोर आमदारांनी आपल्याशी येऊन बोलावं आपण एका क्षणात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणात चेंडू एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात टोलावला होता. ज्याला एकनाथ शिंदे यांनी दोन ट्विट करुन उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं आहे.
'पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे, महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचं आहे.' असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतरही एकनाथ शिंदे यांच्यावर काहीही फरक पडलेला नसून ते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं दिसून आलं आहे.
पाहा एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय ट्विट केलंय:
१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.
३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.
असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. या ट्विटनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उद्धव ठाकरे भाषणात नेमकं काय म्हणाले होते?
'माझेच लोकं म्हणत असतील काँग्रेस-राष्ट्रवादीला तुम्ही हवे असाल पण आम्हाला तुम्ही नकोत.. मग मला हेच म्हणायचं आहे की, समजा.. माझ्या लोकांना.. म्हणजे मी माझं म्हणतोय ते मला आपलं मानतायेत की नाही हे मला माहित नाही. कारण ते माझ्या समोर नाहीत.'
'तुम्ही इथे येऊन बोलायला काय हरकत होती. सूरतला जाऊन बोलण्यापेक्षा आणखी कुठे तरी जाऊन बोलण्यापेक्षा सरळ समोर यायचं आणि सांगायचं उद्धवजी.. तुम्ही कारभार करायला नालायक आहात. हे कोव्हिडच्या काळातील टॉप 5 वैगरे जाऊ दे. आम्हाला तुम्ही मुख्यमंत्रीपदी नको. ठीक आहे चला मी उठतो.' असं स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
'आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो.. की, त्यांच्यापैकी एकाही आमदाराने समोर येऊन मला सांगितलं की, उद्धव ठाकरे पदावर नकोत तर मी आता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. यावर विश्वास नसेल तर आज संध्याकाळापासून मी माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीला हलवत आहे. मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीला चिकटून बसणारा नाही. मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे. त्यामुळे कोणताही मोह मला खेचू शकत नाही. पण माझ्या समोर येऊन बोला.'
'उगाच काही तरी शिवसेनेशी आम्ही गद्दारी करणार नाही. ही शिवसेना आमची शिवसेना वैगरे.. यामध्ये नुकसान कोणाचं होतं आहे.. या समोर बसा.. मी देतो राजीनामा.. मी आज माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो आहे. जे आमदार गायब आहेत किंवा गायब केलेलं आहे त्यांनी यावं आणि माझ्या राजीनाम्याचं पत्र राजभवनमध्ये जावं.' अशी खुली ऑफरच उद्धव ठाकरेंनी शिंदे आणि बंडखोर आमदारांना दिली आहे.
'मी पुन्हा एकदा सांगतो की, हा अगतिकता नाही. आजपर्यंत अशी अनेक आव्हानं आपण बिनसत्तेची पेलली आहेत. हे काय मोठं आव्हान आहे. काय होईल जास्तीत जास्त.. लढू.. परत लढू.. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत. तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. आव्हानाला सामोरा जाणारा माणूस आहे. त्यामुळे कोणत्याही आव्हानाला पाठ दाखवणारा मी नाहीए.'
'हे जसं मी मुख्यमंत्री पदासाठी बोलतोय तसंच मी माझ्या शिवसैनिकांना देखील आवाहन करतो आहे. कारण का.. तर काही जणांचं म्हणणं आहे की, ही शिवसेना बाळासाहेबांची राहिलेली नाही. असे आरोप करत आहेत. पण या आरोपांना देखील माझ्याकडे उत्तर आहे.' असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
'ज्या शिवसैनिकांना वाटत असेल की, मी शिवसेनेचं नेतृत्व करायला नालायक आहे. चला.. तर मला सांगा मी हे देखील पद सोडायला तयार आहे. मी शिवसेना पक्षप्रमुख पद देखील सोडायला तयार आहे. पण हे सांगणारा विरोधक नाही. नाहीतर असे फडतूस लोकं खूप आहेत. त्यांना काही मी बांधील नाही. मी माझ्या शिवसैनिकाला बांधील आहे. शिवसैनिकांनी सांगावं.. मी दोन्ही पदं सोडायला तयार आहे.' अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.