
शिवसेनेविरोधात आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता पक्षाचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून, शिंदे गटाकडून मूळ शिवसेना असल्याचा दावा केला जात आहे. यावर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी उत्तर दिलं असून, एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांवर टीका केलीये.
अरविंद सावंत यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मूळ शिवसेना कुणाची या मुद्द्यावर भूमिका मांडली आहे. "लढाई आता बाळासाहेबांच्या वारशाची सुरू आहे, "बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ही दोन नावं वेगळी करता येऊ शकत नाही. कोणत्याही परिस्थितीत हे करणं शक्य नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी काम करतेय तिच खरी शिवसेना आहे. संविधानाला ठेच पोहोचवली जात आहे. शिवसेना नोंदणीकृत पक्ष आहे. शिवसेना मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्ष आहे," असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
"दोन तृतीयांश आमदार पक्षातून बाहेर पडले आहेत, तर त्यामुळे पक्षच निघून गेला असं होत नाही. शिवसेना पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगवेगळे बाबी आहेत. आता विधिमंडळ पक्षातून काही लोक निघून गेले आहेत. आता काही नगरसेवक गेले आहेत, पण शिवसैनिक आमच्यासोबत आहेत. आमदार, नगरसेवक हे तात्पुरत्या स्वरुपात असतात. शिवसेना शिवसैनिकांचा पक्ष आहे. बंडखोरी केलेल्यांनी आव्हान दिलं म्हणजे शिवसेना पक्ष फुटला असं होत नाही,"असंही ते म्हणाले.
"आमदारांपाठोपाठ आता माजी नगरसेवकही सोडून जाताना दिसत आहे, यावर अरविंद सावंत म्हणाले, "ठाण्यातील नगरसेवक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे नगरसेवक आहेत का? उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर (एकनाथ शिंदे) विश्वास टाकला होता. त्यांना चांगलं मंत्रिपद दिलं होतं. त्याचबरोबर त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारीही दिलेली होती. अशी जबाबदारी आल्यानंतर तिकिटवाटपापासून ते पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांपर्यंत काम करावं लागतं. पण, ही जबाबदारी उद्धव ठाकरेंनी विश्वास टाकल्यामुळे मिळालेली असते. ठाण्याबद्दल त्यांच्यावर (एकनाथ शिंदे) विश्वास टाकलेला होता," असं म्हणत सावंत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.
"युतीच्या काळात यांना मंत्रिपद कुणी दिली होती, तर उद्धव ठाकरेंनीच दिली होती. तेव्हा तर बाळासाहेब नव्हते. २०१४ मध्ये युती कुणी तोडली होती, भाजपनेच तोडली होती. आम्ही तोडली नव्हती. तेव्हा हिंदुत्व कुठे गेलं होतं? तेव्हा हेच विरोधी पक्षनेते होते. नंतर युती झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनीच मंत्री बनवलं. उद्धव ठाकरेंनी जर नाव सुचवलं नसतं तर मंत्री झाले असते का?," असा प्रश्न अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.
"सगळं काही खोटं सांगितलं जात आहे. स्वार्थीपणातून सुरू आहे. ईडी, आयकर विभाग, नार्कोटिक्स, सीबीआय यापासून वाचण्यासाठी पळून गेलेले हे लोक आहेत. असं करून त्यांनी शिवसेनेला त्रास दिलाय. त्यामुळे आजही तुम्ही मातोश्री किंवा शिवसेना भवनात बघितलं तर शिवसैनिकांच्या गर्दी दिसेल, तेही न बोलवता येत आहेत."
"हे लोक प्रलोभन देताहेत किंवा धमकावताहेत. विचार करा हे लोक सुरतला गेले. गुवाहाटीला गेले. गोव्याला गेले. कुठून आले इतके पैसे? हे पैसे कुठून आले याचा विचार ईडीने केलाय का? यांचा खर्च कोण करत आहेत," असं प्रश्न उपस्थित करत अरविंद सावंत यांनी ईडीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
"सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी ११ जुलै रोजी ठरवलेली असतानाही यांनी विश्वासदर्शक ठराव घेतला. जर सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांना अपात्र ठरवलं आणि यांनीच विधानसभा अध्यक्षांची निवडणुकीत मतदान केलंय. हे चालणार आहे का? संविधानाच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. संविधानासोबत खेळ सुरू आहे, यावर सर्व गप्प का आहेत," अशी टीका सावंत यांनी केली.