
राकेश गुडेकर, संगमेश्वर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मशिदीवरील भोंग्यांबाबत अद्यापही ठाम आहेत. अशावेळी आता शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत हे यांनी आज (3 मे) पुन्हा एकदा राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. एवढंच नव्हे तर यावेळी त्यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे.
पाहा विनायक राऊतांनी राज ठाकरेंवर नेमकी काय टीका केली:
'बाळासाहेबांनी यापूर्वी जे-जे सांगितलेलं आहे, त्याचं पूर्ण स्मरण शिवसेनेला आहे. तसेच उद्धवजी ठाकरेंना देखील आहे. त्यामुळे त्याबाबतची आठवण राज ठाकरेंनी करून देण्याची गरज नाही.'
'राज ठाकरे यांनी भाजपची सुपारी घेऊन थयथयाट सुरू केला आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला बाळासाहेब यांच्या शिकवणीची आठवण करून देण्याची गरज नाही.' अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ते आज संगमेश्वर येथे बोलत होते.
'देशातील एकमेव भाडोत्री पक्ष म्हणजे मनसे'
दरम्यान, काल देखील विनायक राऊत यांनी राज ठाकरे आणि मनसेवर टीका केली होती.
'बंधू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. ते उत्तम काम करत आहेत. हे राज ठाकरे यांना पाहवत नाही. याबाबत देखील त्यांना बंधूद्वेष असून त्यातून हा थयथयाट सुरु आहे.' अशी देखील बोचरी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ते काल (3 मे) रत्नागिरीत बोलत होते.
आज रत्नागिरीत त्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अक्षय तृतीयेच्या देखील शहरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या, त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी राऊत म्हणाले की, 'कायदा आणि सुव्यवस्था बघडविण्याचा डाव मनसे आणि भाजपचा आहे. पण त्याला महाराष्ट्रची जनता भीक घालणार नाही.' अशीही टीका देखील विनायक राऊत यांनी भोंगाप्रश्नी केली आहे.
'राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासारख्या आदरणीय व्यक्तीमत्वाचा जो अवमान केलेला आहे, त्याचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही.' असा इशारा देखील खासदार विनायक राऊत यांनी दिला होता.