
राकेश गुडेकर, रत्नागिरी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. 'नॉन मॅट्रिक असलेल्या माणसाने उद्धवजींना असंस्कृत म्हणणं यासारखा दुसरा विनोद नाही.' असं म्हणत विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर मिश्किल शब्दात टीकेची झोड उठवली आहे. ते आज (19 मे) रत्नागिरीत बोलत होते.
नारायण राणे हे सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असल्याने आता विनायक राऊत देखील त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर राणेंनी त्यांच्यावर बरीच टीका केली होती. याच टीकेला प्रत्युत्तर देताना विनायक राऊत म्हणाले की, 'नॉन मॅट्रिक असलेल्या माणसाने उद्धवजींना असंस्कृत म्हणणं यासारखा दुसरा विनोद नाही.' त्यांच्या या प्रत्युत्तरानंतर आता पुढील काळात राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
'ओबीसी आरक्षणाची हत्या कोणी केली हे देवेंद्र फडणवीस यांनी तपासून पहावं'
दरम्यान, याचवेळी बोलताना खासदार विनायक राऊत यांनी ओबीसी आरक्षणावर देखील भाष्य केलं. राज्यात सध्या ओबीसी आरक्षणावरून राजकारण पेटलं आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, 'ओबीसी आरक्षणाची हत्या कोणी केली हे देवेंद्र फडणवीस यांनी तपासून पहावं. तसेच मध्यप्रदेशमध्ये दोन दिवस आधी आरक्षण नाकारलं जातं आणि दोन दिवसानंतर थेट पुन्हा आरक्षण मिळतं हे न उलगडणारं कोडं आहे.'
'महाराष्ट्रानं नेमकं काय पाप केलं आहे. महाराष्ट्र सरकार ओबीसींना योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. याचा सर्वोच्च न्यायालयानं विचार करण गरजेचं होतं. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र दोघांना प्रथम समान न्याय दिला गेला, मात्र नंतर मध्यप्रदेशमध्ये चक्र कसं फिरलं याकडे देश देखील आश्चर्याने पाहत आहे.' असं राऊत यांनी म्हटलं आहे.
ज्ञानवापी मशिदीसंदर्भात केंद्रानं लक्ष द्यावे: राऊत
'ज्ञानवापी मशिदीच्या आत शिवलिंग असल्याचं संशोधन सुरु आहे. त्या ठिकाणी हिंदू मंदिराचे अवशेष आहेत. ते जर असेल तर त्याची योग्य ती दखल केंद्र सरकारने आणि तिथल्या राज्य सरकारने घेणे गरजेचे आहे.'
'ज्या भागात हिंदू मंदिराच्या अवशेष सापडले असतील, तो भाग संरक्षित करावा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटल्याचं कानावर आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं अत्यंत गंभीरपणे विचार करुन पुढचं पाऊल उचलणं गरजेचं आहे.' असंही खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.