'फडणवीस-शिंदे यांचं प्रेम, 'वासू-सपना' सरकार आणि सक्तीची नसबंदी'; शिवसेनेनं पुन्हा डिवचलं

'एक दुजे के लिए', 'आशिकी' चित्रपटांचा उल्लेख करत शिवसेनेची एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर खरपूस टीका
'फडणवीस-शिंदे यांचं प्रेम, 'वासू-सपना' सरकार आणि सक्तीची नसबंदी'; शिवसेनेनं पुन्हा डिवचलं

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना 'एक दुजे के लिए' चित्रपटातील वासू सपनाची उपमा देत शिवसेनेनं पुन्हा एकदा नव्या सरकार टीकेचे बाण डागले आहेत. 'राजकीय कुटुंब नियोजन म्हणायचे ते हेच, पण सर्वोच्च न्यायालयाने सक्तीची नसबंदी केल्यानेच वासू-सपना सरकारवर ही वेळ ओढवली आहे,' असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

शिवसेनेतील नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात नवे सरकार अस्तित्वात आले. दुसरीकडे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावरील शिवसेनेच्या शाब्दिक हल्ल्याची धार वाढली आहे. शिवसेनेकडून सातत्यानं 'सामना'तून टीका होत असून, हिंदी चित्रपटांचे दाखले देत शिवसेनेनं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना डिवचलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तार खोळंबल्यानं राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका होत असून, आता याच मुद्द्यावर शिवसेनेनं म्हटलं आहे, "महाराष्ट्रात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अधिकारावर आहेत, पण ज्याला सरकार म्हणावे अशी व्यवस्था पंधरा दिवसांनंतरही निर्माण होऊ शकली नाही. फडणवीस म्हणतात, ‘महाराष्ट्रात कुणीही ‘सुपर सीएम’ नाही. शिंदे हेच सगळ्यांचे नेते’. अर्थात या सगळ्यांच्या नेत्यांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयात टांगणीला लागले आहे. फडणवीस-शिंदे सरकारच्या असंख्य गमती-जमतींची चेष्टा होऊ लागली आहे. त्या गमती-जमतींचेही अजीर्ण होऊ लागले आहे."

"ठाकरे सरकारने आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्तावही मंजूर केला. या प्रस्तावांना फडणवीस-शिंदे सरकारने ‘बेकायदेशीर’ वगैरे ठरवून स्थगिती दिली व लोकांनी याबाबत धारेवर धरताच पुन्हा एकदा हे प्रस्ताव मंजूर केले. औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव सध्याचे दोन स्तंभी सरकार कोणत्या आधारावर बेकायदेशीर मानतेय?"

'फडणवीस-शिंदे यांचं प्रेम, 'वासू-सपना' सरकार आणि सक्तीची नसबंदी'; शिवसेनेनं पुन्हा डिवचलं
शिवसेनेनंतर आता युवा सेनेलाही ठाण्यात खिंडार; पूर्वेश सरनाईकांकडून आदित्य ठाकरेंना झटका

"एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचं नातं 'वासू-सपना'सारखं"

"शिंदे-फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात नाही. ‘एक दुजे के लिये’ चित्रपटातील ‘वासू-सपना’ या प्रेमवीरांप्रमाणे हे दोघेच फिरतात, मजा मारतात, गाणी गातात, बागडतात. एकंदरीत त्यांच्या जीवनात नव्याने फुलबाग बहरली आहे, पण चित्रपटाच्या पडद्यावरील वासू-सपनाचे प्रेम अस्सल होते. तसे या वासू-सपनाचे आहे काय? स्वार्थ, दगाबाजीच्या पायावर त्यांचे नाते उभे आहे. त्यांची ‘आशिकी’ सत्तेची आहे. त्यांना खुर्चीचा ‘प्रेमरोग’ जडला आहे. खुर्चीलाच ‘अनारकली’ मानून त्यांच्या प्रेमाचे जप-जाप सुरू आहेत," असा टोला शिवसेनेनं शिंदे-फडणवीस यांना लगावला आहे.

"महाराष्ट्राच्या राजकारणात ही नवी ‘लव्हस्टोरी-22’ उदयास आली आह़े ते दोघे बीजवर आहेत. त्यातील एका गटाने तर शिवसेनेच्या नावाने आणाभाका घेऊन बांधलेले मंगळसूत्र ताडकन तोडले, पण तरीही शिवसेनेशिवाय त्यांचा दिवस उगवत नाही की मावळत नाही. वासू-सपनाच्या नव्या प्रेमकहाणीतला हा एक थिल्लर भाग आहे. या जोडीस अद्यापि मंत्रिमंडळाचे वऱ्हाड जमवता आलेले नाही. मंत्रिमंडळरूपी वऱ्हाड गेले कोठे? हा प्रश्नच आहे."
'फडणवीस-शिंदे यांचं प्रेम, 'वासू-सपना' सरकार आणि सक्तीची नसबंदी'; शिवसेनेनं पुन्हा डिवचलं
शिंदे सरकारचं भविष्य काय?; सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर २० जुलैला सुनावणी

"हे सरकार बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे हे फडणवीस-शिंदे यांचं ढोंग"

"फडणवीस-शिंदे यांचे प्रेम किती मुरलेले व जिरलेले आहे, यावरदेखील संशोधन होणे गरजेचे आहे. मुळात त्यांच्या पहिल्या प्रेमाचा अंकुर फुटला कधी व कोणी कोणाची वटपौर्णिमा करून सात जन्मांच्या फेऱ्या मारल्या तो अभ्यासाचा विषय आहे. या वासू-सपनापैकी सत्यवान कोण व सावित्री कोण याचाही कस लागणे बाकी आहे. वासू-सपनाच्या जोडीस सध्या रान मोकळे आहे. कारण दोघांत तिसरा कधी येईल याबाबत घटनात्मक पेच निर्माण झाला आहे, पण घटनात्मक पेचात फसलेले सरकार (दोघांचे) हवे तसे निर्णय बेफाम पद्धतीने घेत सुटले आहे," अशी कोपरखळी शिवसेनेनं लगावली आहे.

"वासू-सपनाचा राजकीय संसार टिकेल की मोडेल याची खात्री नाही, पण अनेक आमदार आपापल्या मतदारसंघातील वऱ्हाडी मुंबईत बोलावून शक्तिप्रदर्शन करीत आहेत. मंत्री किंवा पालकमंत्री होण्यासाठी अनेक अब्दुल्ला दिवाने झाले आहेत. त्यामुळे वासू-सपनाच्या अंगाची हळद उतरण्याआधीच मांडवात जो गोंधळ सुरू झालाय ती गंमत महाराष्ट्रात कधीच घडली नव्हती. फडणवीस-शिंदे यांचे सरकार म्हणे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालले आहे. ही त्यांची बतावणी म्हणजे ढोंग आहे."

"महाराष्ट्रात सध्या असलेले फडणवीस-शिंदे हे दोघांचेच सरकार व दोघांचेच मंत्रिमंडळ हा एक अनोखा प्रयोग म्हणायला हरकत नाही. राजकीय कुटुंब नियोजन म्हणायचे ते हेच, पण सर्वोच्च न्यायालयाने सक्तीची नसबंदी केल्यानेच वासू-सपना सरकारवर ही वेळ ओढवली आहे. ‘हम दो हमारे चालीस’चा प्रयोग सुरत-गुवाहाटी-गोवा असा चालला, पण मुंबईत येताच ‘हम दोनो’वरच भागवावे लागले. दोघांत तिसरा कधी? दोनाचे चार हात कधी? वासू-सपनाच्या संसारवेलीवर पाच-पंचवीस फुले कधी बहरणार? की कायमचेच ‘प्लॅनिंग’ करावे लागणार? याबाबत दोन्ही बाजूंचे वऱ्हाडी साशंक आहेत," असं म्हणत शिवसेनेनं बंडखोर आमदारांवरही निशाणा साधला आहे.
'फडणवीस-शिंदे यांचं प्रेम, 'वासू-सपना' सरकार आणि सक्तीची नसबंदी'; शिवसेनेनं पुन्हा डिवचलं
एकनाथ शिंदेंचं बंड : उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस-अमित शाहांना फोन, दहा दिवसांत काय घडलं?

"पंगत मांडलीय, मांडव सजलाय, पण बँडबाजा-वरात रस्त्यात अडकलीय. त्यामुळे वेळ घालविण्यासाठी औरंगाबादचे संभाजीनगर करण्यावर रोक लावणे, ठाकरे सरकारचे लोककल्याणकारी निर्णय थांबवणे, आरेचे जंगल नष्ट करणे असले प्रकार केले जात आहेत. या ‘प्रेमरोगा’ने वासू-सपनाच्या राजकीय संसाराचे काय व्हायचे ते होईल, पण महाराष्ट्राच्या बाबतीत वेडेवाकडे घडवू पाहणार असतील तर ते सहन करता येणार नाही. महाराष्ट्रावर धोक्याची गिधाडे फडफडत आहेत, पण महाराष्ट्र नाउमेद होणार नाही, लढत राहील," असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in