"नाचे आमदार केंद्राची डफली अन् तुणतुण्यावर नाचताहेत"; सेनेची बंडखोरांसह भाजपवर आगपाखड

eknath shinde vs Uddhav thackeray : एकनाथ शिंदेंसह बंड केलेल्या आमदारांवर सामनातून टीका, शाह-फडणवीस-शिंदेंची भेट झाल्याचाही उल्लेख
"नाचे आमदार केंद्राची डफली अन् तुणतुण्यावर नाचताहेत"; सेनेची बंडखोरांसह भाजपवर आगपाखड

शिवसेना (Shivsena) विरुद्ध शिंदेसेना वाद कोर्टात जाऊन पोहोचलाय. सर्वोच्च न्यायालयात काय फैसला होता, याकडे सगळ्यांचं लक्ष असून, शिवसेनेनं पुन्हा एकदा बंडखोर आमदारांसह भाजपवर आगपाखड केलीये. महाराष्ट्रातून गुवाहाटीत केलेले आमदार नाचे असून, ते भाजपच्या (BJP) डफली आणि तुणतुण्याच्या तालावर नाचत आहेत, अशा शब्दात शिवसेनेनं टीका केली आहे.

"अखेर गुवाहाटी प्रकरणात भाजपचे धोतर सुटले आहे. शिवसेना आमदारांचे बंड हा त्यांचा अंतर्गत मामला आहे असे हे लोक दिवसाढवळ्या सांगत होते, पण बडोद्यात म्हणे श्रीमंत देवेंद्र फडणवीस व अतिश्रीमंत एकनाथ शिंदे यांची काळोखात गुप्त भेट झाली. त्या भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सामील होते. त्यानंतर लगेच १५ बंडखोर आमदारांना केंद्र सरकारने ‘वाय’ दर्जाची विशेष सुरक्षा पुरविण्याचे आदेश काढले. हे १५ आमदार म्हणजे जणू लोकशाही स्वातंत्र्याचे रखवाले आहेत. त्यामुळे त्यांच्या केसालाही धक्का लागू नये असे केंद्राला वाटते काय?" असा प्रश्न सेनेनं उपस्थित केला आहे.

"नाचे आमदार केंद्राची डफली अन् तुणतुण्यावर नाचताहेत"; सेनेची बंडखोरांसह भाजपवर आगपाखड
Eknath Shinde : ''बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठी मरण आलं तरीही बेहत्तर!''

"खरं तर हे लोक ५०-५० कोटी रुपयांत विकले गेलेले बैल किंवा ‘बिग बुल’ आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय वगनाट्यात केंद्राचे डफली, तुणतुणेवाले उतरले असून राज्यातील ‘नाचे’ आमदार त्यांच्या तालावर नाचत आहेत. आता या ‘वग’नाट्याचे सूत्रधार आणि दिग्दर्शक नेमके कोण आहेत, हे उघड झालेच आहे. केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजपचीच या नाच्यांना फूस आहे, त्यांच्या तमाशाचा फड त्यांनीच रंगवला आणि सजवला आहे, कथा-पटकथाही भाजपनेच लिहिली आहे हे आता लपून राहिलेले नाही," असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

"गुवाहाटीमधील जवळपास १५ महाराष्ट्रद्रोही आमदारांना ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. काय तर म्हणे, गुवाहाटीतील काही गद्दारांच्या महाराष्ट्रातील कार्यालयांची तोडफोड झाली. त्यामुळे या आमदारांच्या सुरक्षेचा गहन वगैरे प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो म्हणून केंद्र सरकारने त्यातील १५ जणांना ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे."

"हा राज्य सरकारच्या अधिकारांमध्ये सरळ सरळ हस्तक्षेप आहे. अर्थात, केंद्रातील विद्यमान राज्यकर्त्यांच्या एकाधिकारशाहीचा हा काही पहिलाच नमुना नाही. महाराष्ट्रच नव्हे तर पश्चिम बंगाल, झारखंड, पंजाब, दिल्ली आदी बिगरभाजपशासित राज्यांमध्ये केंद्रातील भाजप सरकार या प्रकारचे हस्तक्षेप नेहमीच करीत आले आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपची सरकारे नाहीत, त्यांच्या घटनात्मक अधिकारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी अधिक्षेप करायचा, त्यांना घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा घोटायचा हे प्रकार सर्रास सुरू आहेत. महाराष्ट्रासारखे छत्रपती शिवरायांचा वारसा चालविणारे स्वाभिमानी राज्यही केंद्राच्या या मोगलाईतून सुटलेले नाही."
"नाचे आमदार केंद्राची डफली अन् तुणतुण्यावर नाचताहेत"; सेनेची बंडखोरांसह भाजपवर आगपाखड
आमच्या जिवाला धोका! रोज मिळत आहेत धमक्या, शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात आणखी एक याचिका

"राज्यातील महाविकास आघाडी सरकारने त्यांना दिलेली सुरक्षा काढून घेतलेली नाही. हे गद्दार बेइमान झाले असले तरी राज्य सरकारने आपला धर्म सोडलेला नाही. राज्य सरकारने आपली नैतिकता आणि इमान सोडले नाही, दुष्टपणा केला नाही. असे असूनही आता केंद्र सरकारने गुवाहाटीतील 15 गद्दारांना ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याचा नतद्रष्टपणा केला आहे. केंद्रातील भाजप सरकारचा हा महाराष्ट्रद्वेष नवीन नाही. याआधीही मुंबई आणि महाराष्ट्राशी उघड द्रोह करणाऱ्यांना केंद्र सरकारने ‘वाय’पासून ‘झेड’पर्यंत सुरक्षा दिलीच आहे," असं म्हणत शिवसेनेनं केंद्रावर निशाणा साधला आहे.

"महाराष्ट्रावर चिखलफेक करणारी बेताल नटी कंगना राणावत, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर खोटे आरोप करून चिखलफेकीचे कंत्राट घेतलेले ‘महात्मा’ किरीट सोमय्या, पवार कुटुंबीयांविरोधात बेताल आरोप करणारे सदाभाऊ खोत यांसह अनेकांना केंद्र सरकारने आतापर्यंत होलसेलात ‘वाय’ दर्जाची सुरक्षा दिली आहे. राजकीय विरोधकांविरोधात खोटे आरोप करणाऱ्या, धमक्या देणाऱ्या भाजपपुरस्कृत मंडळींना ‘वाय’पासून ‘झेड’पर्यंत सुरक्षा देण्याचा सपाटाच केंद्रातील भाजप सरकारने लावला आहे," असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

"नाचे आमदार केंद्राची डफली अन् तुणतुण्यावर नाचताहेत"; सेनेची बंडखोरांसह भाजपवर आगपाखड
Deepak Kesarkar : बाळासाहेब ठाकरे असते तर संजय राऊत यांना शिवसेनेतून हाकलून दिलं असतं

"देशभरात अशा ‘वाय’वाल्यांची फौजच त्यांना उभी करायची आहे काय? त्यांच्या याच फौजेत आता गुवाहाटीमध्ये असलेल्या 15 गद्दार ‘नाच्यां’ची भर पडली आहे. त्यांनाही केंद्राने ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याचे जाहीर केले आहे. मोदी सरकारचा हा निर्णय केंद्रीय सुरक्षेची ‘वाय झेड’ करणारा तर आहेच, शिवाय गुवाहाटीत सुरू असलेल्या महाराष्ट्रद्रोहाच्या तमाशाचा फड भाजपच्याच तालमीत सुरू असल्याचा पुरावादेखील आहे. भाजपच्या महाराष्ट्रद्रोहाचे पितळ त्यामुळे पूर्णपणे उघडे पडले आहे. निदान आता तरी या महाराष्ट्रद्रोहाशी आपला काही संबंध नाही, असा आव आणू नका. महाराष्ट्रद्रोह्यांना परस्पर ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याचा केंद्राचा निर्णय हादेखील द्रोहच आहे. त्याची किंमत भविष्यात त्यांना चुकवावीच लागेल," असा इशारा शिवसेनेनं यांनी दिला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in