ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय साळवी यांना पोलिसांकडून तडीपारीची नोटीस

नोटीशीला कायदेशीर उत्तर देणार असल्याचं विजय साळवी यांनी म्हटलं आहे
Shiv Sena's district chief Vijay Salvi has been served with a Tadipari Notice of by the police
Shiv Sena's district chief Vijay Salvi has been served with a Tadipari Notice of by the police

ठाकरे गटाचे कल्याणमध्ये राहणारे जिल्हा प्रमुख विजय साळवी यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांतून २ वर्षांसाठी तुम्हाला तडीपार का करण्यात येऊ नये असं पोलिसांनी नोटीसमध्ये विचारलं आहे. ही कारवाई अन्यायकारक आहे तसंच आपण या कारवाईला कायदेशी उत्तर देऊ असं विजय साळवी यांनी म्हटलं आहे. मात्र कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे.

विजय साळवी यांना काय नोटीस बजावण्यात आली आहे?

महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ च्या कलम ५६ (१)(अ)(ब) प्रमाणे ही नोटीस बजावण्यात आली आहे. महात्मा फुले चौक आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिवाजी चौक, कल्याण पश्चिम, तेजश्री बिल्डिंग, एमएसईबीच्या कार्यलाजवळ, महात्मा फुले चौक, भाजप शहर कार्यालय, अहिल्याबाई चौक, लाल चौकी, खडकपाडा या सगळ्या सार्वजनिक ठिकाणी तुम्ही अपराध केले आहेत. अजूनही अपराध करत आहात. तुम्ही खडपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २/२०४ महावीर नगरी टॉवर, खडपाडा कल्याण पश्चिम या ठिकाणी वास्तव्यास आहात. तुमचे गुन्हेगारीचे क्षेत्र हे महात्मा फुले चौक आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यातील आजाबाजूचा परिसर आहे असा उल्लेख करत ही नोटीस बजावण्यात आली आहे. विजय साळवी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर ही नोटीस पोस्ट केली आहे.

ठाणे, रायगड आणि मुंबई यामध्ये राहण्यास मनाई

ठाणे, नवी मुंबई, मुंबई मुलुंड या कुठल्याही भागात तुम्ही राहू शकत नाही. त्याचप्रमाणे बदलापूर, अंबरनाथ, कल्याण भिवंडी या भागांमध्येही तुम्ही राहू शकत नाही. कारण या सगळ्या ठिकाणाहून तुम्ही तुमचं गुन्हेगारीचं क्षेत्र गाठू शकता. तुमच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी ठाणे, मुंबई आणि रायगड या तीन जिल्ह्यांच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तुम्हाला तडीपार करावं असा प्रस्ताव आहे असंही या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

पोलिसांनी वाचला गुन्ह्यांचा पाढा

तुम्ही तुमच्या साथीदारांसह आपसात संगनमत करून पाच किंवा पाचपेक्षा अधिक पुरूष आणि महिला जमा करून घोषणाबाजी करणं, मनाई आदेशाचा भंग करणं, अनधिकृत बॅनर, बोर्ड लावणे. मोर्चा काढून सरकारी कामात अडथळा निर्माण करणं, तसंच दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रतिकृतींचं प्रदर्शन करून घोषणाबाजी करणे, अशा प्रकारचे अपराध तुम्ही करत असतात.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in