
४० आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी फाटाफूट झाली आहे. या फाटाफुटीतून शिवसेना सावरण्यासाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत, उद्धव ठाकरे हे सगळेच उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारपासून निष्ठा यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेच्या शाखा तसंच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांनाही भेट देत आहेत. शिवसेना संपली असा दावा करणाऱ्यांना आता आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले आहेत आदित्य ठाकरे? (Aditya Thackeray)
ज्यांचं रक्त भगवं आहे ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत. आम्ही सगळीकडे फिरत आहोत. लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद शिवसेना तसंच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ज्यांना त्यांच्यासोबत (एकनाथ शिंदे गट) जायचं असेल ते जातील. मात्र जो मूळ नागरिक आहे जो शिवसैनिक आहे ज्याचं रक्त भगवं आहे ते सगळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हणाले आदित्य ठाकरे?
ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला त्यांनीच आम्हाला दगा दिला. कदाचित आमच्याकडून राजकारण कमी झालं असेल. मात्र समाजकारणात आम्ही कुठेही कमी पडलेलो नाही.ज्यांना परत शिवसेनेत यायचं असेल त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत. पण ज्यांना वाटतं आहे की त्यांचं तिकडे भलं होईल त्यांनी तिथेच थांबावं. दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेत (Shiv Sena) जी उभी फूट पडली त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार गेले आहेत. या गटाचे एकनाथ शिंदे हे प्रमुख आहेत. भाजपच्या साथीने ते सत्तेवर आले आहेत. भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपदही दिलं आहे. एकनाथ शिंदे हे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यानंतर शिवसेनेतलं बंड आणखी विस्तारलं आहे.
शिवसेनेच्या नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली येथील नगरसेवकांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणखी फुटू नये यासाठी आदित्य ठाकरे तयारीला लागले आहेत. त्यांनी आज शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना उद्देशून हे उत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरे यांची सध्या निष्ठा यात्रा सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेला सावरण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. ते शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मतदारासंघात जाऊन तेथील शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. या यात्रेची मुंबईतील भायखळा येथून सुरुवात झाली.