'कुठे गंगू तेली अन् कुठे राजा भोज', आमदार साळवींची किरीट सोमय्यांवर जहरी टीका

एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे, अशात राजन साळवी यांनी किरीट सोमय्यांवर टीका केली आहे
Rajan Salavi
Rajan Salavi

राकेश गुडेकर

रत्नागिरी: शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ट्विटरवरून टीका करणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेना उपनेते, आमदार राजन साळवी यांनी जोरदार टीका केली आहे. साळवी म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. किरीट सोमय्या हा भाजपचा दलाल आहे. दलालीच्या माध्यमातून हा संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर फिरत असतो, असं त्याचं कर्तृत्व आहे ते जनतेला माहिती आहे.

कुठे हा गंगू तेली आणि कुठे आमचे राजा भोज अशी जहरी टिका साळवी यांनी यावेळी केली. तसेच उद्धव साहेब ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून जे काम केलं आहे तसेच उद्धव साहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून आदर्शवत असं काम केलं आहे. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाबाबत संपूर्ण जगाने त्यांना गौरवलं आहे. आणि अशा एका सृजनशील व्यक्तिमत्वाबाबत सोमय्या यांच्यासारख्या वक्तव्य करणे हे निश्चितच निषेधार्ह असल्याचं साळवी यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कोणीही गोठवू शकत नाही, असं राजन साळवी यावेळी म्हणाले.

दरम्यान एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांनी शिवसेनेविरोधात बंड केले आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन झाले. आता शिवसेनेचे बंडखोर नेते थेट शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा ठोकायला लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेचं चिन्ह आगामी निवडणुकीत कोणाला मिळणार याचा निर्णय निवडणूक आयोगाला घेण्याची वेळ येणार आहे.

आता दोन्ही गटाने जर चिन्हावर दावा ठोकला तर परिणामी निवणूक आयोग चिन्ह गोठवू शकते आणि दोन्ही गटाला नवीन चिन्ह दिली जाऊ शकतात. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाणाशिवाय लढण्याची तयारी ठेवा असे आवाहन शिवसैनिकांना केले आहे. महत्त्वाचं म्हरणजे ११ जुलै रोजी न्यायालयात सुनावणी आहे त्याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. एकनाथ शिंदे यांचे गटनेते पद आणि भरत गोगावले व्हीप यांच्यावर सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर शिवसेनेने एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांना निलंबनाची नोटीस दिली होती त्यावरही सुनावणी आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in