
मुंबई: उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भावनिक ट्वीट करत आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच आहोत असे सांगितले आहे. एकीकडे शिवसेनेचे कट्टर नेते शिवसेनेतून बंड करत बाहेर पडत असताना काही नेते शिवसेनेशी कट्टर आहेत. एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, राजन विचारे यासारखे कट्टर शिवसैनिक समजले जाणाऱ्या नेत्यांनीच शिवसेनेविरोधात बंड पुकारले आहे, त्यामुळे शिवसेनेसह संपूर्ण राज्याला धक्का बसला आहे. अशातच उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ट्वीट केले आहे, ट्वीटमध्ये त्यांनी कैलास चौधरी (kailash Patil) यांचे कौतुक केले आहे.
ओमराजे निंबाळकर यांचे सविस्तर ट्वीट
"जात, गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना"
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण एका वेगळ्या वळणावर आले आहे. यात शिवसेनेच्या काही नेत्यांनी वेगळा निर्णय घेऊन आपल्याच काही सहकाऱ्यांना महाराष्ट्राबाहेर घेऊन जाऊन पक्ष श्रेष्टींशी प्रतारणा केली आहे. यातील अनेक जण हे
परत येऊ इच्छितात व या सगळ्या सहकाऱ्यां मध्ये पहिले हिमतीचे काम केले ते माझे मित्र व सहकारी आमदार श्री.कैलास पाटील यांनी.
त्यांनी स्वतः सगळा प्रसंग आज प्रेस समोर सांगितला. सत्ता येत राहते व जात राहते परंतु जे धैर्य व निष्ठा तुम्ही शिवसेना व आपल्या पक्ष प्रमुखांबद्दल दाखवली त्याची नोंद ही कायमस्वरूपी राजकीय इतिहासात झाली.
कैलासजी व माझा अनेक वर्षांचा स्नेह अतिशय संयमी व मितभाषी असलेले कैलासजी हे पक्षाबद्दल व "ठाकरे" परिवाराबद्दल कायमच भावूक असलेले मी वेळोवेळी पाहिले आहे व त्याची प्रचिती पूर्ण राज्याला या दोन दिवसात आलीच आहे.
आम्ही बाळासाहेबांना दैवत मानणारे त्यांच्याच पुत्राला या संकटसमयी एकटे सोडून कसे जाणार. आपण धाराशिव चा आमदार तर आहोतच पण सर्वप्रथम बाळासाहेबांचा मावळा आहे, हेच आमदार कैलास पाटील यांनी दाखविले.
माझ्या मित्राच्या या निष्टे बद्दल व धैर्याबद्दल आमदार कैलास पाटील यांना मनापासून सलाम असे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी पूर्ण राज्यात आहेत ज्यांचा धर्म, जात व गोत्र फक्त "शिवसेना" आणि असे सर्व जण खंबीरपणे उद्धवजी ना साथ देणार आहोत, हे ही निश्चित. "जात, गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना"
अशा आशयाचे ट्विट ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे. त्यामुळे ८० टक्के शिवसेना एकनाथ शिंदेंसोबत असताना उर्वरीत शिवसेना उद्धव ठाकरेंसोबत आहे.
असे निसटले होते कैलास पाटील
कैलास पाटील हे अगोदर एकनाथ शिंदे गटासोबत होते. परंतु त्यांनी लघुशंकेचा बहाणा करत धूम ठोकली. अंधाराचा रस्ता, पाऊस या सगळ्यात चार किमी भिजत चालत जाऊन त्यांनी हे अंतर कापलं. समोरच्या रस्त्यावरून येणाऱ्या एका दुचाकीची लिफ्ट घेतली. दुचाकीस्वार गाव आल्याने थांबला त्यानंतर कैलास पाटील यांनी पुन्हा पायी प्रवास सुरू केला. एका ट्रकला लिफ्ट मागून ते दहीसरला पोहचले. त्यानंतर आपल्या वाहनाने त्यांनी वर्षा बंगला गाठला.