थापा आले, आता मिलिंद नार्वेकर आमच्याकडे येत आहेत : गुलाबराव पाटील यांच्या दाव्याने खळबळ

मिलिंद नार्वेकर खरंच एकनाथ शिंदे गटात जाणार का?
Milind Narvekar - Gulabrao Patil
Milind Narvekar - Gulabrao Patil Mumbai Tak

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखे वावरणारे थापा हे आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत. त्यापाठोपाठ आता शिवसेना सचिव आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकरही आमच्याकडे येत आहेत, असा दावा शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. ते शुक्रवारी रात्री उशीरा धुळ्यातील जाहीर सभेत बोलत होते. पाटील यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

गुलाबराव पाटील म्हणाले, आरोप करतात की आम्ही 50 खोके घेतले. बर गुलाबराव पाटलांनी 50 खोके घेतले मान्य आहे. पण चंपासिंह थापाने काय घेतले? ज्या थापाने त्याचे संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केले होते. ज्या थापाने बाळासाहेबांच्या अग्नीला हात लावला, तो थापाही यांना सोडून आला. त्यावर अरविंद सावंत यांनी टीका केली की त्याला पण माल दिला असेल. पण आता मिलिंद नार्वेकरही आमच्याकडे येत आहेत.

पाटील यांच्या या जाहीर दाव्यानंतर मिलिंद नार्वेकर खरंच एकनाथ शिंदे गटात जाणार का असा सवाल विचारला जात आहे. मिलींद नार्वेकर उद्धव ठाकरे यांचे खास निकटवर्तीय मानले जातात. याशिवाय नार्वेकर यांच्यावर ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आणि पक्षाच्या सचिव पदाचीही जबाबदारी आहे. ज्यावेळी शिंदे गट बंड करुन सुरतला गेला होता, त्यावेळी शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना परत बोलावण्याची जबाबदारी नार्वेकर यांच्यावरच सोपवण्यात आली होती. त्यावेळी नार्वेकर हे देखील सुरतला सुद्धा गेले होते.

एकनाथ शिंदे - नार्वेकरांच्या वाढती जवळीक?

एका बाजूला ठाकरे-शिंदे यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष सुरु असतानाच एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांची दोनवेळा भेट झाली होती. काही दिवसांपूर्वी मिलिंद नार्वेकर यांना मातृशोक झाला होता. त्यांच्या मातोश्रींच्या निधनाचे वृत्त समजताच एकनाथ शिंदे यांनी नार्वेकरांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. तसेच नुकतेच गणेशोत्सवामध्येही शिंदे यांनी नार्वेकर यांच्या घरी जावून त्यांचे दर्शन घेतले होते. शिवाय दोघांमध्ये बराच वेळ चर्चाही झाली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in