Exclusive: आरक्षण… जरांगे-पाटील ते मुख्यमंत्री… छगन भुजबळांची बेधडक मुलाखत जशीच्या तशी!

साहिल जोशी

ADVERTISEMENT

maratha reservation obc manoj jarange patil to chief minister eknath shinde chhagan bhujbal fearless exclusive interview as it is
maratha reservation obc manoj jarange patil to chief minister eknath shinde chhagan bhujbal fearless exclusive interview as it is
social share
google news

Chhagan Bhujbal Exclusive Interview: मुंबई: मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण द्या… अशी मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj jarange-Patil) यांना थेट प्रत्युत्तर देणारे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे सध्या अधिकच आक्रमक झाले आहेत. मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले वाचा जसंच्या तसं.. (maratha reservation obc manoj jarange patil to chief minister eknath shinde chhagan bhujbal fearless exclusive interview as it is)

ADVERTISEMENT

वाचा छगन भुजबळांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत…

माझी जी भूमिका आहे ती 35 वर्षांपासूनची आहे. मंडल आयोगाला पाठिंबा.. ही माझी भूमिका होती. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्या ही माझी नाही तर सगळ्याच पक्षाची भूमिका आहे. जरांगेंनी मला सुरुवातीलाच टार्गेट केलं.. ए.. भुजबळ.. काय बोलत होता आणि काय नाही.. मी म्हटलं जाऊ दे..

ओबीसीमध्ये 375 जाती आहे.. आता त्यात काय आरक्षण मिळणार आहे.. म्हणून म्हटलं मराठ्यांना आरक्षण वेगळं द्या. मला घाणेरडे-घाणेरडे मेसेज.. शिव्या देणं चालू.. मी म्हटलं जाऊ दे.. पण नंतर त्यांनी आमदारांची घरं जाळायला सुरुवात केली.

मग मात्र मी उठलो.. पोलीस काही करायला तयार नाही.. अडकाठी का केली नाही पोलिसांनी? तुम्ही मीडियाने जरांगे उपोषणाला बसला असताना पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला हे सारखं दाखवलं. पण का केला हल्ला.. पोलीस काय वेडे आहेत का? नंतर तिथला SP म्हणतो की, माझे 70 लोकं दवाखान्यात आहेत.

जरांगेला अटक करायला गेले नव्हते.. रुग्णालयात दाखल करायला गेले होते. पण त्याआधी घरांच्या गच्चीवर दगडं जमा करून ठेवली होती. पोलीस गेले तसा दगडांचा मारा सुरू झाला. महिला पोलीस जखमी झाले. त्यामुळे पोलीस चिडले आणि त्यांनी मागे-पुढे पाहिलं नाही. मी ही घटना वारंवार सांगणार..

जसं पवार साहेबांना माहीत नव्हतं की, पोलिसांवर दगडफेक झाली वैगरे… तसं अजित पवारांना देखील माहीत नव्हतं. गृहमंत्रालय काय सगळ्यांनाचा सांगत नाही. त्यात गृहमंत्रालयाची चूक आहे..

जे लाठीहल्ला झाल्यानंतर गेले.. त्यांनी जाळपोळीनंतरही जायला हवं होतं. त्यांच्याही आमदारांची घरं पेटली होती. मी बघायला गेल्यानंतर पहिले दीड महिने जरांगे मला शिव्या देत होता. पण जाळपोळीचं चित्र पाहिल्यानंतर मला राहावलं नाही. म्हणून मी संभाजीनगरमध्ये पहिल्यांदा बोललो.

मी कॅबिनेटमध्येच नाही तर सर्वपक्षीय बैठकीत देखील बोललो.. पोलीस हतबल का झाले? पण त्यावर बैठकीत चर्चाच झाली नाही. फडणवीसांनी उत्तर दिलं असतं.. पण पवार साहेब बोलले नाही, फडणवीस बोलले नाही..

प्रश्न- मुख्यमंत्री उपोषण सोडवायला गेले होते. मुख्यमंत्र्यांनी ते पाऊल उचललं होतं म्हणून ही सगळी चूक झाली का? म्हणजे तसं तुम्ही म्हणालात की, मंत्री तिकडे गेले त्यांच्यासमोर वाकले वैगरे..

काही मंत्री गेले नाही.. उपमुख्यमंत्री सुद्धा गेले नाहीत. मुख्यमंत्री माझे बॉस आहेत मी त्यांच्यावर कमेंट करू शकत नाही. फक्त

मुख्यमंत्र्यांनी मला सुरुवातीला विचारलं.. निजामशाहीत पुरावे आहेत. तिथे जर पुरावे सापडले कुणबींचे तर द्यायला काही हरकत नाही ना? मी म्हटलं हरकत नाही.. आधी काय म्हणाले 5000 हजार पुरावे सापडले. जरांगे म्हणाले मला चालणार.. दोन दिवसांनी साडे अकरा हजार नंतर मंत्रिमंडळ बैठकीत साडे तेरा हजार..

तेही नाही.. मराठवाड्यातीस सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या.. नंतर त्याच्याही पुढे अख्ख्या महाराष्ट्रातील मराठ्यांना प्रमाणपत्र द्या. मग त्यासाठी शिंदे समिती.. प्रश्न असा आहे की, जे खरोखर कुणबी आहेत.. तुम्ही म्हणता की, ओबीसीला धक्का लागणार नाही.. एकदा कुणबी प्रमाणपत्र मिळालं की, पुढचा भाग हा जातपडताळणी..

आम्ही पण आहोत आमच्याकडे लक्ष ठेवा हे सांगायला लाखो लोक अंबडला आले. रडल्याशिवाय आईपण दूध देत नाही. मग आम्ही पण रडल्याशिवाय आमचं आरक्षण वाचतच नाही. आम्हाला वाटतं आमचं आरक्षण वाचलं पाहिजे.

मी बाळासाहेबांसोबत शिवतीर्थावर जाहीर सभा घ्यायचो, तेव्हा ते कधी सांगायचे नाही की हे बोल किंवा ते बोल.. पवार साहेबांसुद्धा विचारू शकता. मी मला वाटेल ते बोलायचो.. जे बोलतात ना आता की, तुमचं जे स्क्रिप्ट आहे ते भाजपने लिहून दिलेलं आहे. माझं स्क्रिप्ट छत्रपती, फुले, आंबेडकरांनी काही वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं आहे. तेच स्क्रिप्ट वाचत असतो आणि काम करत असतो. त्यात स्वकीयांचं रक्षण करा… जे अडले-नडले आहेत त्यांना आरक्षण द्या.. हेच काम करताकरता वेळ पुरत नाही. दुसऱ्याची स्क्रिप्ट कुठे घेऊन बसता..

प्रश्न – लोकं म्हणता की, तुम्ही मंत्रिमंडळात पण राहताय आणि बाहेर जाऊन विरोधी पक्षाचं कामही करताय.

ठीकए.. मला सांगा राजीनामा द्या म्हणून.. आता यावरून त्यांना जे करायचं ते करतील. मला जे बोलायचं ते बोलतो.

प्रश्न – तुम्हाला यावरून राजीनामा द्यायला सांगितला तर देणार?

देणार… आमदारकीचा राजीनामा द्यायला सांगितला तर देणार.. त्यांचा अधिकार आहे. सरळच आहे ना राव.. मी पार्टीचा बांधील आहे. दोन नंबर मी मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करतो. तीन नंबर सरकारमध्ये सर्वात मोठी महाशक्ती भाजप आहे.. आता त्यांनी सांगितलं की, भुजबळ आऊट तर आऊट.. आपल्याला त्याचं काही पडलेलं नाही.

‘आमदारकीला मला कोणीही पाडू शकत नाही’

जरांगे सारखं म्हणतो बघतो तुला.. अरे काय बघतो.. पाडतो तुला.. अरे कुठे पाडतो आमदारकीला.. हँ…

एकतर आमदारकीला मला कोणी पाडू शकत नाही आणि मी तिथे गेलोच मुळी विकास या कामासाठी आतापर्यंत 20 वर्षात तिथे भेदभाव कुठलाच केला नाही. मराठा असेल ओबीसी असेल.. मला त्याची भीती नाही.. मला उद्या कोणी सांगितलं नाही उभं राहायचं तर नाही राहणार.. पण ओबीसीचं काम माझं आहे मी सोडणार नाही

महाराष्ट्रात 100 टक्के जातगणना व्हायला हवी. आम्ही इथे 54 टक्के आहोत म्हणतोय. बिहारमध्ये 64 टक्के निघालेत. करा ना गणना.. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या हे आम्हाला अजिबात मान्य नाही. आम्ही कमी आहोत की ते आहेत ते दिसेल.

भुजबळ पंतप्रधान मोदींची भेट घेणार?

आम्ही आता काय भेटणार.. ते निवडणुकीच्या कामामध्ये.. त्यानंतर भेट मिळेल त्यावेळेला आम्ही भेटू.. तुमच्याद्वारे जे काही त्यांच्या कानापर्यंत जाईल.. तर मला आनंद होईल.

मी जे काही बोलतो ठासून बोलतो.. मंत्रिपद अनेक वेळा घेतलं अनेक वेळा गेलं. ज्या वेळेस माझ्या पक्षाला वाटेल अडचण आहे पक्षाची.. किंवा ज्या वेळेला शिंदे-फडणवीसांना.. की, माझी अडचण आहे.. मला फक्त सांगितलं तर.. मी त्यांना दोष देणार नाही. आनंदाने बाजूला होईल, मोकळा होईन आणि रोज मीटिंग लावेन.

जरांगेचं गावं कुठे बीडमध्ये.. लोकांना विचारा तो कुठे आला त्या अंतरवाली सराटीमध्ये. त्याची ती सासरवाडी आहे.. मला तिथल्या लोकांनीच सांगितलं. तो जेव्हा मला बोलला की, भुजबळ अडीच वर्ष बेसन भाकरी खाऊन आला.. अरे बेसन भाकरी मी घरी पण खातो. आनंदाने खातो.. पण तुमच्यासारखं नाही.. तुम्ही कुठे खात बसला.. खा तुम्ही.. पण आम्हाला बोललात तर आम्ही उत्तर देणार.

अजितदादांनी सुरुवातीलाच सांगितलं.. ते जर त्यांच्या समाजाची मतं मांडत असतील तर भुजबळ हे त्यांच्या समाजाची मतं मांडत आहेत. त्यात चुकलं काय?

दादा म्हणाले की, प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. पण यामुळे दुसऱ्या समाजावर वाईट परिणाम होईल असं काही बोलू नका..

मी शरद पवारांच्या हाताखाली काम केलं. आता अजित दादा आणि शिंदेंच्या हाताखाली काम करतो. मला कशाला मराठ्यांचं वावडं असेल ना.. तसा प्रश्न नाही.. परंतु जरांगे मला वाईट वाईट बोलले.. का तर त्याची सभा जोरात व्हावी म्हणून.. नाहीतर त्याला किंमत कोण देणार आहे.. म्हणून छगन भुजबळलाच टार्गेट करा..

तुला काय करायचं ते तू कर.. माझ्या समाजावर मी बोलणार नाही.. मला जे घाणेरडे मेसेज जे आले ना.. ते अनेक आमदारांना.. अगदी गृहमंत्र्यांना देखील वाईट वाईट मेसेज गेले आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.. अरे ला कारे कोणी तरी उत्तर देणार..

भुजबळांनी कधी कोणाला शिव्या दिल्या की, कधी कुठे दगडफेक केली की कोणाची घरं जाळली.. पण ही प्रवृत्ती थांबवा तुम्ही. आम्ही आमच्या आरक्षणासाठी लढू ते त्यांच्या आरक्षणासाठी लढतील. आमचं म्हणणं आहे की, घरंदारं पेटवायला निघाले तरी बोलायचं नाही आम्ही? एवढी दहशत जर निर्माण होत असेल तर कोणी तरी उभं राहायला हवं. गेला तर गेला बळी आमचा.. काय फरक पडतो.

हे ही वाचा>> Exclusive: मुख्यमंत्र्यांनी ‘ती’ चूक केली? छगन भुजबळ म्हणाले, ‘ते’ माझे बॉस..

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT