शरद पवारांच्या निर्णयानंतर संजय राऊतांनी सांगितला बाळासाहेबांचा ‘तो’ किस्सा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी या राजकीय विषयावर भाष्य केलं.
ADVERTISEMENT
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय आज पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील भाषणादरम्यान जाहीर केला. शरद पवारांच्या या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंपच झाला. अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. तर कार्यकर्त्यांनीही निर्णय मागे घेण्याचा आग्रह धरला. बराच ड्रामा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात बघायला मिळाला. यावर खासदार संजय राऊतांनीही भाष्य केलं आहे. यावेळी संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दलची 1990 ची घटनाही सांगितली.
ADVERTISEMENT
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी राजकारण संन्यास घेतला नाही, अशी माझी माहिती आहे. शरद पवारांसारखे नेते राजकारणातून, समाजकारणातून कधीही निवृत्त होत नाही. पण, हा त्यांचा पक्षातंर्गत विषय आहे. आणि त्यांच्या पक्षातंर्गत निर्णयावर शिवसेनेनं भाष्य करणं योग्य नाही.”
हेही वाचा >> शरद पवारांच्या निर्णयानंतर हाय होल्टेज ड्रामा! जयंत पाटील ढसाढसा रडले
“ते शरद पवार असल्यामुळे मी इतकंच सांगेन की देशाला आणि महाराष्ट्राला त्यांच्या नेतृत्वाची आणि मार्गदर्शनाची गरज आहे. इतके वर्ष त्यांनी देशाला, राज्याला नेतृत्व दिले. ते यापुढेही देतील, असं मी त्यांचं विधान ऐकलं. एखाद्या पदावरून निवृत्त होणं म्हणजे राजकारण, समाजकारणातून दूर होणं असं नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
हे वाचलं का?
“याचं विश्लेषण शरद पवारचं करू शकतात”
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, “मी असं पाहिलं की त्यांच्या पक्षात बैठका सुरू आहेत. काही निर्णय घेतले जातील. पण, या सगळ्या घडामोडी अचानक घडून आल्या असल्या, तरी सगळ्यांसाठी धक्कादायक, खळबळजनक असल्या, तरी त्यात अनपेक्षित असं काही नाही, असं अलीकडच्या काही घटनांवरून मला वाटतं. शरद पवारांनी हा जो निर्णय घेतला. हा कोणत्या परिस्थितीत घेतला आणि का घेतला, याचं विश्लेषण तेच करू शकतात.”
बाळासाहेब ठाकरेंनी दिला होता राजीनामा, नंतर काय घडलं… राऊतांनी सांगितलं…
या घटनेवर बोलताना संजय राऊतांनी 1990 चा प्रसंग सांगितला. ते म्हणाले, “काही वर्षांपूर्वी 1990 दरम्यान हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी यांनी सुद्धा शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. पक्षातील राजकारणातील आणि महाराष्ट्रातील काही घडामोडींचा त्यांना उबग आला आणि त्यातून त्यांनी राजीनामा दिला. पण, लोकमतांचा आणि शिवसैनिकांचा रेटा एवढा अफाट होता की, काही दिवसांनी त्यांना तो राजीनामा परत घेऊन पुन्हा एकदा शिवसेनाप्रमुख पदावर विराजमान जनतेनं केलं.”
ADVERTISEMENT
“असे नेते निर्णय अनेकदा एका विशिष्ट परिस्थितीत निर्णय घेतात. शरद पवारांनी तसा निर्णय घेतला असेल, तर तो त्यांच्या निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या घडामोडींचा महाविकास आघाडीवर याचा काहीही परिणाम होणार नाही”, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> शरद पवारांच्या निर्णयानंतर अजित पवार कार्यकर्त्यांवर भडकले, सगळेच चक्रावले
“शिवसेना हा पक्ष हा ठाकरे या नावावर चाललेला आहे. कुणी शिंदे, मिंधे, गिंडे गेले कुठेही आणि निवडणूक आयोगाने त्यांच्या हातावर जरी पक्ष ठेवलेला असला, तरी जिथे ठाकरे, तिथे शिवसेना. त्यापद्धतीने जिथे शरद पवार तिथे त्यांचा पक्ष हे महाराष्ट्रात आणि देशात ठरलेलं आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT