
स्वाती चिखलीकर, सांगली: सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि भाजपचे नेते निशिकांत पाटील यांची विधानपरिषदेवर नियुक्ती व्हावी म्हणून त्यांचा कट्टर कार्यकर्ता प्रवीण माने याने चक्क स्वतःच्या रक्ताने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दोन स्वतंत्र पत्रे लिहिली आहेत.
भाजपा युवा मोर्चाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष असणारे प्रवीण माने यांनी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहलं असून त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, 'ही माझ्यासह तालुक्यातील असंख्य लोकांची व कार्यकर्त्यांची इच्छा आहे.'
'त्या' पत्रात नेमकं काय म्हटलंय?
'राजकीय तसेच सामाजिक कार्य करीत असताना विरोधी गटाकडून त्यांना अडचणीत आणण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. तरीही ते डगमगले नाहीत. भाजपचा प्रचार आणि प्रसार त्यांनी सुरूच ठेवला आहे. अशा कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्वाला विधान परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली तर खऱ्या अर्थाने या मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्याचा सन्मान होईल.'
'सध्या सुरु असलेला राजकिय संस्थांत्मक व कार्यकर्त्याचा संघर्ष या निवडीमुळे संपून जाईल व भविष्यात या मतदारसंघातून विधानसभेमध्ये भाजपाचा आमदार पोहचवण्यासाठी बळ मिळेल.' असेही प्रवीण माने यांनी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, आपल्या एका नेत्यासाठी कार्यकर्त्याने स्वत:च्या रक्ताने लिहलेल्या या पत्राची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.
देवेंद्र फडणवीस कोणाला देणार संधी?
मात्र, असं असलं तरीही देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे निशिकांत पाटील यांची विधानपरिषदेवर निवड करतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की, विधानपरिषदेवर निवड व्हावी यासाठी भाजपमधील अनेक दिग्गजांनी आतापासूनच देव पाण्यात ठेवले आहेत. असं असताना निशिकांत पाटील यांची वर्णी लागणार तरी कशी? असा सवाल राजकीय जाणकारांना पडला आहे.
दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या राजकारणात धक्कातंत्राचा वापर करत आले आहेत. अशावेळी ते विधानपरिषदेवर एखाद्या नवख्या चेहऱ्याला संधीही देऊ शकतात. त्यामुळे आता जुलै महिन्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.
पंकजा मुंडेंची विधानपरिषदेवर वर्णी लागणार?
दरम्यान, या सगळ्यात आतापर्यंत गेल्या काही वर्षात राजकीय दृष्ट्या उपक्षेतिच ठेवण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांच्यामध्ये प्रचंड क्षमता असून देखील त्यांना जाणीवपूर्वक राज्यातील राजकारणातून दूर ठेवलं जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. असं असताना आता तरी विधानपरिषदेवर पाठवून त्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी त्यांच्या समर्थकांची आहे.
मात्र, याचबाबत जेव्हा पंकजा मुंडे यांना विचारण्यात आलं तेव्हा त्या असं म्हणाल्या की, 'पक्ष काय निर्णय घेईल ते आगामी काळात बघू. दिल्लीत मला मंत्रिपद मिळावं असं अनेकांना वाटतं माझ्याविषयी लोकांची ही इच्छा आहे. सध्या नावं चर्चेत आहेत. मात्र पक्ष काय निर्णय घेईल ते कळेलच. तेव्हाचं तेव्हा पाहू.'
राज्यसभा असेल किंवा विधान परिषद असेल त्यासाठी तुमच्या नावाची चर्चा होते आहे मग पक्ष संधी देत नाही का? की तुम्हाला संधी मिळत नाही? हा प्रश्न विचारला असता पंकजा मुंडे म्हणाल्या की 'मला कुठल्याही संधीची अपेक्षा नाही. कुठल्या संधीसाठी मी प्रयत्नही करत नाही. संधी मिळावी यासाठी वाट पाहणाऱ्या राजकारण्यांमध्ये मी नाही. जे मिळतं त्याची संधी करून दाखवणं, संधीचं सोनं करून दाखवणं हे माझं काम आहे आणि हेच माझे संस्कार आहेत.'
गोपीनाथ मुंडे यांनी जी पदं भुषवली त्या पदांना त्यांनी आणखी मोठं केलं. संधीसाठी रांगेत वाट पाहणं ही माझी प्रवृत्ती नाही" असं उत्तर पंकजा मुंडे यांनी दिलं आहे.