अनिल परबांशी संबंधित 'ते' रिसॉर्ट पडणार?, किरीट सोमय्यांच्या ट्विटने चर्चांना उधाण

भाजपचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या राज्यातील अनेक नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत.
अनिल परबांशी संबंधित 'ते' रिसॉर्ट पडणार?, किरीट सोमय्यांच्या ट्विटने चर्चांना उधाण

मुंबई: भाजपचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या राज्यातील अनेक नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री अनिल परब, खासदार संजय राऊत यांच्यावर ते प्रामुख्याने आरोप करत आहेत. आता किरीट सोमय्या यांनी नवं ट्विट केले आहे. किरीट सोमय्या मागच्या अनेक दिवसांपासून अनिल परब यांच्यावर दापोलीतील एका रिसोर्ट प्रकरणी आरोप करत आहेत. त्यांनी प्रतिकात्मक हातोडा घेऊन मागच्या काळात रॅली काढली होती. हे रिसोर्ट बेकायदेशीर आहे ते पाडण्यात यावे अशी मागणी किरीट सोमय्या यांची आहे.

किरीट सोमय्या आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाले आहेत?

किरीट सोमय्यांच्या नव्या ट्विटने चर्चाणा उधाण आले आहे. ''अनिल परब रिसॉर्ट...पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरावा करत आहोत...दोन चार दिवसांत रिसॉर्ट पाडण्याचा अंतिम आदेश अपेक्षित आहे.'' असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे. त्यामुळे आता आरोप होत असलेले ते रिसोर्ट पडेल असे संकेत सोमय्यांनी दिलेत असे म्हणायला हारकत नाही.

या रिसॉर्टमुळे कसे अडकत गेले अनिल परब?

अनिल परब यांचं रिसॉर्ट मागच्या काही काळापासून ईडीच्या रडारवर होतं त्याचा तपासही ईडीकडून करण्यात आला होता. याच रिसोर्टच्या आधारे ईडीने छापेमारी केली आहे, तसंच चौकशीही सुरू करण्यात आली होती. याआधी ८ मार्चला आयकर विभागाने मुंबईतल्या एका केबल ऑपरेटवरवर तसंच वाहतूक विभागातील एक कर्मचारी आणि त्याच्याशी संबंधित व्यवसायांवर शोध मोहीम राबवली होती.

मुंबई, पुणे, सांगली आणि रत्नागिरी अशा २६ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत असताना दापोली येथील जमीनाचा काही भाग २०१७ मध्ये अनिल परब यांनी १ कोटी रूपयांना खरेदी केल्याचं आढळून आलं. या मालमत्तेची नोंदणी २०१९ मध्ये झाली होती असंही समोर आलं. सदर जमीन नंतर 2020 मध्ये शोध कारवाईमध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींपैकी एकाला 1.10 कोटी रुपयांच्या मोबदल्यात विकली गेली.

सदरची जमीन तीच आहे ज्यावर २०१७ ते २०२० या कालावधीत रिसॉर्ट बांधण्यात आलं. अनिल परब यांच्याववर जमिनीची नोंदणी होईपर्यंत रिसॉर्टच्या बांधकामाचा मोठा भाग बांधून पूर्ण झाला होता. नंतर २०२० मध्ये जेव्हा ही प्रॉपर्टी विकण्यात आली तेव्हा रिसॉर्टचं काम पूर्ण झालं होतं. त्यामुळे हे रिसॉर्टच अनिल परब यांच्यावर झालेल्या कारवाईचं मूळ ठरलं.

सर्वात महत्त्वाची बाब ही की रिसॉर्टच्या बांधकामाची माहिती नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आली नाही. त्यामुळेच या रिसॉर्टची चर्चा झाली आणि त्यावरून कारवाई सुरू झाली. आयकर विभाग शोध घेत असताना आढळलेल्या पुराव्यांवरून हे दिसून आलं की रिसॉर्टचं बांधकाम २०१७ मध्ये सुरू झालं आणि या रिसॉर्टच्या बांधकामासाठी ६ कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च झाला. तया बांधकामाचा खर्च केबल ऑपरेटर आणि अनिल परब यांच्या हिशोबाच्या खात्यात नाही. त्यामुळेच रिसॉर्टवरून अनिल परब अडचणीत आले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in