
औरंगाबाद: औरंगाबादमधील जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुरुवातीलाच निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी भाजपने काढलेला आक्रोश मोर्चा हा संभाजीनगरकरांसाठी काढलेला नव्हता तर तो त्यांची सत्ता गेली त्यासाठी होता. असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले:
'पाणीपुरवठ्याची एक जुनी योजना आहे. जी गंजून-सडून गेली आहे. तिच्यासाठी देखील पैसा देतोय. गेल्या वर्षी मी आलो होतो समांतर जलवाहिनी योजनेच्या उद्घाटनासाठी. त्याचं भूमिपूजन मी केलं होतं. तेव्हा मी वचन दिलं होतं. की, या योजनेचा पाठपुरावा मी स्वत: करेन. दुर्दैवाने दीड वर्ष कोरोनामध्ये गेलं. पण कोरोनामुळे आम्ही रडत नाही बसणार.' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
'मी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की, जे कोणी मध्ये येतील त्यांना दांडुक्यांनी सरळ करा आणि ही योजना पूर्ण करा. मग एक प्रश्न निर्माण झाला. की, इतर वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. पण तरीही मी सांगितलं की, या योजनेला एकही पैसा कमी पडू देणार नाही. पण एवढं करुनही जर कंत्राटदार आढ्याला पाय लावून बसला तर मी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की, सरळ पकडायचं आणि त्यांना आत तुरुंगात टाकायचं. असे सगळे निर्णय मी घेतले आहे.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपण पाणी योजनेसाठी कठोर निर्णय घेणार असल्याचं यावेळी स्पष्ट केलं.
'या सगळ्यात मध्ये कोणीतरी आक्रोश मोर्चा काढला होता. जनआक्रोश की जलआक्रोश. पण हा आक्रोश मोर्चा त्यांची सत्ता गेली म्हणून काढला होता. तो काही संभाजीनगरकरांच्या पाण्यासाठी नव्हता. कारण पाण्यासाठी जर का आक्रोश असता तर आमच्या आधी 5 वर्ष तुम्हीच बसला होतात तिकडे. आम्ही तुमच्या सोबत होतो. किती पैसे दिले होते या योजनेला?' असा टोला हाणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
'अनेक काही चांगल्या गोष्टी आम्ही करतोय. रस्त्याच्या कामाला हात घातलाय आणि रस्ते देखील चांगले होत चालले आहेत. जर मेट्रोची गरज लागली तर मेट्रोचा प्लॅन बनविण्याची सुरुवात आपण केलेली आहे. पण आपल्याकडे जी मेट्रो बनेल ती मेट्रो शहराचं विद्रूपीकरण करणारी नसेल. आम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत, वाट्टेल ते करा. शहराची विल्हेवाट लागली तरी चालेल पण मेट्रो झालीच पाहिजे हे असं विध्वंसक विकास काम आम्ही कधी केलेलं नाही.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मेट्रोच्या कामावरुन देवेंद्र फडणवीसांवरच निशाणा साधलेला आहे.
आता उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.