
रत्नागिरी: मी देखील गुवाहाटीला गेलो आशा बातम्या आल्या, पण मी आता रत्नागिरीतल्या पाली येथील माझ्या घरी आलो आहे. मी शिवसेनेतच आहे असं शिवसेना नेते उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज रत्नागिरीतील पाली येथील त्यांच्या निवासस्थानी बोलत होते.
यावेळी सामंत म्हणाले की, मी शिवसेनेतच (Shivsena) आहे, आमच्या प्रतोदांनी काढलेली नोटीस आणि त्यांच्या प्रतोदानी काढलेली नोटीस त्यामध्ये टेक्निकली बाजू समजून घ्याव्या लागतील. त्यानंतरच यावर बोलणं उचित ठरेल, पण भविष्यात कायदेशीर लढाई अटळ आहे आणि कायदेशीर लढाईला आम्हाला सामोरं गेलं पाहिजे असं सामंत यावेळी म्हणाले. दरम्यान आमदार शिरसाट काय बोलले त्यावर मी माझं मत व्यक्त करणं मला उचित वाटत नाही, मी जोडणारा आहे तोडणारा नाही. मला हे सर्व जोडावं असं वाटतं असं सामंत यावेळी म्हणाले.
दरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची सुरवातीपासूनच नेमकी भूमिका काय आहे हे काय पक्षाला कळली नाही, किंवा पक्षप्रमुखांना समजली नाही. ती भूमिका मांडणं आवश्यक आहे असं मला वाटतं. माझी भूमिका मी बैठकीमध्ये मांडलेली आहे. पक्ष जर पुन्हा उभा करायचा असेल तर मला वाटतं की कुठंतरी सगळ्यांना विश्वासात घेऊन जे आपल्यापासून दूर गेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे असं मला वैयक्तिक वाटतं. आमच्या लोकांमध्ये जे गैरसमज असतील ते दूर करणं गरजेचं आहे. या सगळ्या संदर्भात कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. शिवसेना पक्ष डॅमेज होणार नाही अशा पद्धतीची भूमिका मांडली गेली पाहिजे असं सामंत यावेळी म्हणाले.
''बंडखोरांना सतत आव्हानं द्यायची वेळ नाही''
शिवसेना आमदार भास्कर जाधव हे नॉट रिचेबल आहेत अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यात ते म्हणाले मी महाराष्ट्रातच आहे, कुठेही गेलेलो नाही. यानंतर पुढे ते म्हणाले ''संजय राऊत यांना सल्ला देणारा एवढा मी मोठा नाही. सतत आव्हानं का द्यायची, ही वेळ तोडण्याची नाही जोडण्याची आहे, त्यामुळे आमदारांची नाराजी का आहे हे समजून घेण्याची वेळ आहे. ती नाराजी दूर करण्याची वेळ आहे आव्हानं देण्यापेक्षा संवाद वाढवणं गरजेचं आहे. आज मंत्री पदाबद्दल पण नाराजी आहे. अपक्षांना मंत्रीपदं दिली ते कुठे आहेत आता सर्वाना जोडलं पाहिजे.