
मुंबई: देहूमधील संत तुकारामांच्या शिळा मंदिर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेसने यावरुन भाजपवर तुफान टीका केली होती. खासदार सुप्रिया सुळेंनी यावरुन आंदोलन देखील केलं होतं. मात्र, याबाबत आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. 'अजितदादा आणि पंतप्रधान हे इतक्या चांगल्या मनमोकळेपणे बोलत होते. पण मला तर असं वाटतं की, कदाचित हे अजितदादांच्या विरोधातच षडयंत्र आहे.' असं फडणवीस यावेळी म्हणाले.
'अजितदादांचं नाव नाही असं लक्षात आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: म्हणाले की, 'अरे अजितजी नही बोलेंगे?, अजितजी आप बोलिए.' असं म्हटलं. त्यानंतर अजितदादांनी सांगितलं की, 'नाही आपणच बोला.' हे सगळं काही लोकांना पाहवत नाहीए.' असं फडणवीस यावेळी म्हणाले. पण फडणवीसांचा नेमका इशारा हा सुप्रिया सुळेंकडे असल्याचं बोललं जात आहे.
पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:
'मला असं वाटतं की, अजितदादा आणि पंतप्रधान हे इतक्या चांगल्या मनमोकळेपणे बोलत होते, पंतप्रधानांनी अजितदादांची विचारपूस केली. एवढंच नाही तर अजितदादांचं नाव नाही असं लक्षात आल्यावर पंतप्रधान स्वत: म्हणाले की, 'अरे अजितजी नही बोलेंगे?, अजितजी आप बोलिए.' असं म्हटलं. त्यानंतर अजितदादांनी सांगितलं की, 'नाही आपणच बोला.' हे सगळं काही लोकांना पाहवत नाहीए.'
'इतका चांगला कार्यक्रम झाल्यानंतर जाणीवपूर्वक अशाप्रकारे त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतोय. मला तर असं वाटतं की, कदाचित हे अजितदादांच्या विरोधातच षडयंत्र आहे.' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना यानिमित्ताने चुचकारण्याचा प्रयत्न केला.
देहूतील वादावर अजित पवार काय म्हणाले होते?
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी यावरून आंदोलन केलं. मात्र, याच मुद्द्यावर अजित पवारांनी भूमिका मांडतांना महत्त्वाचा विषय नसल्याचं म्हटलं आहे. 'मला हा विषय वाढवायचा नाही. या विषयाला महत्त्व देऊ नका,' असं एका ओळीतच अजित पवारांनी या वादाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केली होती.
देहूतील कार्यक्रमात स्टेजवर नेमकं काय घडलं होतं?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 14 जून रोजी देहूतील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं होतं. यावेळी राज्यभरातून वारकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. त्यानंतर अजित पवारांचे भाषण होईल असे वाटत होते. परंतु सुत्रसंचालकाने थेट नरेंद्र मोदींना भाषणासाठी आमंत्रित केले. स्वत: नरेंद्र मोदींनी अजित पवारांना बोलण्यासाठी आग्रह केला. परंतु अजित पवार तुम्ही बोला म्हणाले.
या सगळ्यानंतर एक मोठा वाद सुरु झाला होता. घडलेल्या प्रकारावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर टीकेची झोड उठवली होती.