'अक्कलदाढ नसलेल्या पण अक्कल असलेल्या...', मतदार संघात येताच उदय सामंतांनी सगळं स्पष्ट केलं

शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांनी राज्यसभा निवडणुकीच्या वेळी काय घडलं हे सांगितले आहे.
'अक्कलदाढ नसलेल्या पण अक्कल असलेल्या...', मतदार संघात येताच उदय सामंतांनी सगळं स्पष्ट केलं

राकेश गुडेकर

रत्नागिरी: शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांनी राज्यसभा निवडणुकीच्या वेळी काय घडलं हे सांगितले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत संभाजी राजे छत्रपती यांना उमेदवारी द्यायची फायनल झाली, त्या सर्व सिस्टीममध्ये मी होतो.

संभाजी राजेंनी जो उल्लेख केला होता की कॅबिनेट मंत्री माझा ड्राफ्ट बनवत होते, तो ड्राफ्ट बनवणारा मंत्री मी होतो, पण अचानक संजय पवार यांना तिकीट देण्यात आलं, ते देखील योग्य होतं, पण तिथे देखील सर्वसामान्य शिवसैनिकाला राज्यसभेत जाण्यापासून रोखण्यात आलं म्हणून हा उठाव होता असे उदय सामंत म्हणाले आहेत. 2 वर्षांपूर्वी जी विधानपरिषद निवडणूक झाली त्यावेळी, शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. आमचा उमेदवार निवडून येऊ नये यासाठी काही लोकांनी षडयंत्र रचलं असेही उदय सामंत म्हणाले आहेत.

काय म्हणाले उदय सामंत (Uday Samant)?

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावाला काहीतरी कारण आहे, दरम्यान हे सर्व झालं ते जोडण्याचा प्रयत्न कोणीही करत नव्हता, याला साक्षीदार स्वतः खासदार विनायक राऊत आहेत असं शिंदे गटात गेलेले आमदार उदय सामंत यांनी म्हटलं आहे, ते आज रत्नागिरीतील पाली या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते. सत्ता नाट्यानंतर उदय सामंत आज पहिल्यांदा रत्नागिरीत आले. यावेळी मोठ्या संख्येने सामंत यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सामंत म्हणाले की, शेवटच्या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत माझ्यासारख्या अक्कलदाढ नसलेल्या पण अक्कल असलेल्या आमदाराने ही शिवसेना एकसंध राहावी यासाठी प्रयत्न केला, पण त्यामध्ये यश आलं नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत, बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये याला आम्हाला यश येईल, आणि प्रत्येकाचे गैरसमज दूर होतील असं सामंत यावेळी म्हणाले.

शिवसेनेचा सर्वसामान्य शाखाप्रमुख मुख्यमंत्री होत असताना त्याचं मी आमदार म्हणून समर्थन केलं याचा मला अभिमान आहे. एकनाथ शिंदे हे समाजात उतरून लोकांमध्ये काम करणारं नेतृत्व आहे, आशा रांगड्या नेतृत्वाच्या मागे उभं राहण्याचा निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्त्याने घेतला, असं सामंतांनी यावेळी स्पष्ट केलं.

आम्ही भाजपमध्ये गेलेलो नाही, महाराष्ट्र विधिमंडळ शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळालेली आहे, आमचे गटनेते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि मुख्य प्रतोद भरतजी गोगावले आहेत. विधिमंडळातला शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळालेली आहे, असंही सामंत यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in