
मुंबई: 'मी बाळासाहेबांसारखा भोळा नाही. तर थोडासा धूर्त आहे.' असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ता वृत्तपत्राला दिलेला लाइव्ह मुलाखतीत केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी मात्र, तुफान टीका केली आहे.
'हे मात्र, बरं झालं की.. मुख्यमंत्र्यांनी स्वत: कबूल केलं की, मी धूर्त आहे. आमची फसगत मात्र नक्की झाली.' असं म्हणत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.
पाहा आशिष शेलार नेमकं काय म्हणाले:
'हे मात्र, बरं झालं की.. मुख्यमंत्र्यांनी स्वत: कबूल केलं की, मी धूर्त आहे. आमची फसगत मात्र नक्की झाली. आम्ही त्यांना भावासारखं मानलं. ते धूर्त होते हे कळायला आम्हाला उशीर झाला.'
'त्या धूर्त पद्धतीनेच आमच्या बरोबर मतं घेतली आणि सरकार दुसऱ्या बरोबर स्थापन केलं. हा धूर्तपणा त्यांनी कबूल केला हे बरं झालं.' असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.
पाहा उद्धव ठाकरे काय म्हणाले होते:
'आम्ही जर का वाईट कारभार करत असू तर जरुर आम्हाला उघडं पाडा लोकांसमोर पण महाराष्ट्राच्या संस्कृतीबाबत विचाराल तर कुठे नेऊन ठेवताय तुम्ही महाराष्ट्र, कोणती संस्कृती.. ही सूडबुद्धी आली कुठून? हा विकृतपणा आला कुठून.. हे विकृत, सडलेलं राजकारण आहे ही कदापि महाराष्ट्राची संस्कृती नव्हती आणि महाराष्ट्र कदापि हे मान्य करणार नाही.'
'पण सडक्या, कुजक्या आणि नासलेल्या विचारांनी जर राजकारणात घाणेरडेपणा आणला तर लोकंच यांना जाब विचारतील की कुठे नेताय महाराष्ट्र आमचा. हे असं राजकारण महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षित नाही. ते सुद्धा कशासाठी तर केवळ मला पाहिजे यासाठी.'
'तुम्हाला आठवत असेल पालघरची पोटनिवडणूक झाली होती. चिंतामण वनगांच्या निधनानंतर. त्यावेळेस श्रीनिवास आणि त्यांचा परिवार माझ्याकडे आला होता. तेव्हा आम्ही त्याच्यासोबत राहिलो. तो म्हणाला की, मी निवडणुकीला उभा राहतो. मी म्हणालो की राहा.'
'मला एवढं काही कळत नव्हतं अशातला काही भाग नाही. आठ-नऊ महिने राहिलेले असताना पोटनिवडणूक लढवायची. माझी तेव्हा प्रामाणिक इच्छा होती की, त्या चिंतामणरावांच्या मुलाला भाजपने उमेदवारी द्यायला पाहिजे होती.'
'चिंतामण वनगांसारखी माणसं एवढी पक्षाशी एकनिष्ठ राहून सुद्धा तुम्ही त्या कुटुंबाच्या मागे उभं राहत नाही. ही मला चीड आणणारी गोष्ट होती. त्यावेळीही माझ्यावर आरोप करण्यात आला होता की, ती शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना नाही.'
'मी म्हटलं की, बरोबर आहे बाळासाहेब भोळे होते. बाळासाहेबांना तुम्ही त्यावेळेस कसे फसवत गेलात हे मी त्यावेळी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे. म्हणून मी नाही म्हटलं तरी तुमच्याशी धूर्तपणाने वागतो आहे. मी नाही भोळा..'
'माझे वडील भोळे होते.. ते हिंदुत्वासाठी.. म्हणजे हिंदुत्व हे माझ्याही रक्तात त्यांनीच भिनवलं आहे. पण हिंदुत्वाच्या आडून तुम्ही जे तुमचे डाव साधत होतात त्याकडे ते कानाडोळा करत होते. पण मी नाही करणार.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला एक प्रकारे इशाराच दिला आहे.