
Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा करत बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवलं, असं विधान काल एकनाथ शिंदे यांनी यांनी केलं होतं. याच विधानाचा धागा पकडत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नसल्याचं स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी अमित शाहांनी दिलेल्या वचनाची आठवण करून दिली.
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नसल्याचं सांगितलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, "जे काल झालं, तेच २०१९ मध्ये युती करताना मी अमित शाहांसोबत बोललो होतो. अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा, असंच मी म्हणालो होतो आणि तेच झालंय. त्यांनी जर केलेला करार पाळला असता, तर महाविकास आघाडी स्थापनच झाली नसती."
"सुरुवातीचे अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असता आणि आता महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असता," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"एका तथाकथित शिवसैनिकाला (एकनाथ शिंदे) मुख्यमंत्री बनवण्यात आलं आहे. मी अमित शाह यांना हेच बोललो होतो. काल जे घडलं ते सन्मानपूर्वक केलं जाऊ शकलं असतं. त्यावेळी शिवसेना भाजपसोबत होती,"अशी भूमिका त्यांनी मांडली.
मेट्रो ३ कारशेडच्या मुद्द्यावरही उद्धव ठाकरे यांनी सरकारला विनंती केली. ते म्हणाले, "माझा राग मुंबईकरांवर काढू नका. मेट्रो कारशेड स्थलांतरित करू नका. मुंबईच्या वातावरणाशी खेळ करू नका," असं ते म्हणाले.
शिंदे-भाजपकडून शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याचा दावा
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही याला दुजोरा दिला. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची संधी असताना त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवलं, असं ते म्हणाले.
भाजपच्या नेत्यांकडूनही देवेंद्र फडणवीस यांनी दिलदारपणा दाखवत एकनाथ शिंदे यांना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याचं म्हटलं जातंय. अनेक नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून ट्विट करत भूमिका मांडलेली आहे.