
गोंडा (उत्तर प्रदेश): मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला 5 जूनचा अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांनी दौरा स्थगित केला आहे. पण त्यांनी उत्तर भारतीयांची माफी काही मागितलेली नाही. त्यामुळे त्यांची अकड आजही कायम आहे. अशा शब्दात बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध केला होता. जर राज ठाकरेंनी अयोध्येला येण्याआधी उत्तर भारतीयांची माफी मागितली नाही तर त्यांना मी अयोध्येत पाय ठेवू देणार नाही आणि त्यासाठी मी किती सक्षम आहे हे तुम्हाला त्या दिवशी कळेलच असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं होतं.
'मात्र, आता राज ठाकरे यांचा दौरा स्थगित झाल्यानंतर बृजभूषण सिंह यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. ही लढाई काही एखादी सत्ता मिळविण्यासाठी किंवा उखडून टाकण्यासाठी नाहीए. तर ही लढाई स्वाभिमानाची आहे. त्यामुळे राज ठाकरे जोवर माफी मागत नाहीत तोवर त्यांना उत्तर प्रदेशात पाय ठेवू देणार नाही.' असं बृजभूषण यावेळी म्हणाले.
बृजभूषण सिंह हे राज ठाकरेंबाबत काय म्हणाले:
'मी सांगितलं होतं की, त्यांनी माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही. भलेही त्यांनी आपला दौरा स्थगित केलेला असो पण त्यांनी माफी मागितलेली नाही. केवळ दौरा स्थगित केला आहे. त्यामुळे आपल्याला हनुमानजीच्या साक्षीने शपथ घ्यावी लागेल की, उत्तरप्रदेश, झारखंड, बिहार, मध्यप्रदेश, हरियाणा, उत्तराखंड जेवढे पण आपले हे प्रदेश आहेत. जोवर ती व्यक्ती माफी मागणार नाहीत तोवर त्यांना या प्रदेशात उतरुन देणार नाही.'
'काही नावं घेतली जातात काही नाही घेतली जात. अजूनही काही प्रांत आहेत जे कधी-कधी चांगली भाषा वापरत नाहीत. एक वेळ अशी होती जग फार मोठं होतं. पण आता जग फार लहान झालं आहे. सर्वांना व्यवसाय करण्याचा हक्क आहे. आमच्या भारताचं संविधान असं म्हणतं की, भाषा, धर्म, जात, रंगाच्या आधारावर तुम्ही कोणासोबत भेदभाव करु शकत नाही.'
'ही पहिली लढाई आहे. समोर अयोध्या आहे. पहिल्यांदा अशी लढाई लढली जात आहे जी ना सत्ता मिळविण्यासाठी आहे किंवा ना सत्ता उखडून टाकण्यासाठी आहे. पहिल्यांदा अशी एक लढाई आहे जी उत्तर भारतीयांद्वारे लढली जात आहे. ही लढाई अन्यायाविरुद्ध आहे आणि स्वाभिमानासाठी लढली जात आहे.'
'स्वातंत्र्याच्या वेळी हिंदू-मुस्लिम एकत्र लढत होते. स्वातंत्र्यानंतर जेव्हा देशात पहिल्यांदा आणीबाणी लागली तेव्हा इंदिराजींच्या त्या अत्याचाराविरोधात देखील हिंदू-मुस्लिम लढत होते. पण 45 वर्षानंतर.. स्वातंत्र्यानंतर ही तिसरी वेळ आहे एक आंदोलन तुम्ही लोकांनी छेडलं.'
'लक्षात घ्या, मी जो काही संकल्प केला होता तो तुमच्या जोरावर केला होता. तेव्हा मी पाच लाख लोकं जमा होती हे तुमच्या जोरावर म्हटलं होतं.'
'आज त्यांनी आपला दौरा स्थगित केला पण माफी मागितली नाही. त्यामुळे अजूनही अकड कायम आहे. त्यामुळे आपला दौरा काही स्थगित होणार नाही. त्यामुळे आपण मात्र अयोध्याला जाणार आहोत.'
'मला ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्यांनी साथ दिली नाही. मला साथ कोणी दिली तर ती मुलांनी, शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी दिली आहे.' असं म्हणत बृजभूषण यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे.