
एकनाथ शिंदे विरूद्ध उद्धव ठाकरे असा सामना चांगलाच रंगला आहे. महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा आठवा दिवस आहे. महाविकास आघाडी सरकारचं नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. क्षणाक्षणाला नव्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटची बैठक घेतली. या बैठकीत राजीनामा देणार नाही यावर आपण ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मंत्रिमंडाळानेही त्यांना पाठिंबा दिला आहे.
या मिटिंगच्या आधी एक महत्वाची घडामोड घडली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुवाहाटीला गेलेल्या शिवसैनिकांना एक भावनिक आवाहन केलं होतं. कुटुंबप्रमुख या नात्याने मी तुम्हाला आवाहन करतो आहे, मला तुमची काळजी वाटते आहे असं त्यांनी आमदारांच्या बाबतीत म्हटलं होतं. या आवाहनला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. काही वेळापूर्वीच ट्विट करून त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले आहेत एकनाथ शिंदे?
"एका बाजूला आपल्या मुलाने आणि प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील आणि मृतदेह म्हणायचं, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्याबाजूला हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची याचा अर्थ काय?" असा प्रश्न विचारत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आवाहनला उत्तर दिलं आहे.
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी करत शिवसेनेतल्या ३९ आमदारांनी बंडखोरी केली आहे. आठवडाभरापासून राज्यात राजकीय नाट्य रंगलं आहे.देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे.
ख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले?
शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो
जय महाराष्ट्र !
आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत.
आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे. आपण या माझ्या समोर बसा.
शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही.
समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.
आपला नम्र
उद्धव बाळासाहेब ठाकरे