
मुंबई: 'आम्ही मैत्री पाळली पण भाजपकडून मैत्री पाळली जात नाही अशी अमच्या कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे. प्रेम हे दोन्ही बाजूनं असावं लागतं. एकतर्फी प्रेम फार काळ टिकत नाही.' अशा शब्दात माजी आमदार विनायक मेटे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. विधानपरिषदेत आमदार म्हणून आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळेल अशी विनायक मेटेंना आशा होती. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत मेटेंना संधी न मिळाल्याने त्यांनी भाजपबाबत सपशेल नाराज असल्याचं म्हटलं आहे.
पाहा विनायक मेटे नेमकं काय म्हणाले:
'फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. आम्ही त्या मित्र म्हणून समजून घेतो. त्यामुळे राज्यसभेला आमचे दोन आमदार भाजपच्या उमेदवाराला समर्थन देणार. मात्र राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आम्ही विधानपरिषदेला कोणाला मतदान करायचं हे ठरवणार. त्याआधी चंद्रकांत पाटलांशी चर्चा करून आमची भूमिका स्पष्ट करू.' असं विनायक मेटे यावेळी म्हणाले.
'पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय राजकारणात जबाबदारी दिलेली आहे. त्यांची नाराजी आहे की नाही याबाबत माहिती नाही. माझं वैयक्तिक त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही.' अशी प्रतिक्रिया विनायक मेटे यांनी दिली आहे.
राज्यसभा निवडणुकीसोबतच विधान परिषद निवडणुकीतही चुरस
राज्यसभा निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार दिल्याने निवडणूक होणार आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेसाठी देखील भाजपने 5 अधिकृत उमेदवार दिले आहेत. याशिवाय सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे. त्यांना भाजप पाठिंबा देणार असल्याचं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी भाजपने जवळजवळ 6 उमेदवार दिले आहेत. तर महाविकास आघाडीतील तीनही पक्षाने प्रत्येकी 2-2 उमेदवार दिले आहेत. त्यामुळे आता 12 पैकी कोणते 10 उमेदवार निवडून जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, भाजपने पाच अधिकृत उमेदवारांमध्ये विनायक मेटेंना संधी दिली नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. तर सहावा उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत यांना आपला पाठिंबा दर्शवल्यामुळे विनायक मेटेंच्या सर्व आशा संपुष्टात आल्या आहेत.
विनायक मेटे यांना खात्री होती की, त्यांना विधानपरिषदेसाठी भाजप नक्की संधी देईल. पण भाजपने ऐनवेळी मेटेंचा पत्ता कापला. याआधी विनायक मेटे हे भाजपच्या पाठिंब्यावर विधानपरिषदेवर गेले होते. त्यामुळे आत देखील तशीच संधी मिळेल असं त्यांना वाटत होतं. मात्र, तसं न झाल्याने मेटे हे कमालीचे नाराज झाले आहेत.