''आम्ही वेट वॉचच्या भूमिकेत, भाजपचा तुर्तास सरकार स्थापनेचा दावा नाही''

एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेतून बंडाची तलवार उगारल्यानंतर राज्यात एकच राजकीय भूकंप पाहायला मिळाला.
''आम्ही वेट वॉचच्या भूमिकेत, भाजपचा तुर्तास सरकार स्थापनेचा दावा नाही''
Raosaheb DanveMumbai Tak

मुंबई: एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेतून बंडाची तलवार उगारल्यानंतर राज्यात एकच राजकीय भूकंप पाहायला मिळाला. एका बाजूला महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका होत असताना तिकडे भाजपच्या नेत्यांच्या बैठका होत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील उपस्थीत होते.

आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, नेहमीच आपापसात भांडणे होत असतात, त्यांच्याकडूनच सरकार पाडले जाईल, आम्ही फक्त वेट करत आहोत. आम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार नाही असे मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनीही आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजून या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे भाजप कशा पद्धतीने निर्णय घेणार याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही वेळापुर्वी महाराष्ट्राला संबोधित केले. आपण मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहोत परंतु बंड केलेल्या आमदारांनी समोर येऊन सांगावे असे मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री आपल्या भाषणात काय म्हणाले?

''शिवसेना हिंदुत्वापासून दूर जाऊ शकत नाही म्हणून आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे सगळे अयोध्येला गेले. हिंदुत्वावर विधानसभेत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही अशीही बातमी पसरवण्यात आली. त्यात काहीही तथ्य नाही. २०१४ ला ६३ आमदार निवडून आले तेदेखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. शिवसेना बाळासाहेबांचीच आहे.. पण मधल्या काळात जे मिळालं ते याच शिवसेनेमुळे.''

''शिवसेना आणि हिंदुत्व हे दोन एकमेकांमध्ये गुंफलेले शब्द आहे. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे हे शिवसेना प्रमुखांनाही सांगितलं होतं. हिंदुत्वासाठी कुणी काय केलं हे बोलण्याची आत्ताची वेळ नाही. शिवसेना बाळासाहेबांची नाही असं भासवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून झाली आहे. त्या आणि आत्ताच्या शिवसेनेत काय फरक आहे? मी बाळासाहेब ठाकरेंचेच विचार पुढे नेतो आहे. २०१४ ला आपण एकटे लढलो होतो.''

''२०१४ लाही आपण हिंदूच होतो आजही आहे, उद्याही राहणार. २०१४ ला ६३ आमदार निवडून आले त्यानंतर जे मंत्री झाले ती शिवसेनाही बाळासाहेब ठाकरेंच्या नंतरचीच शिवसेना होती. त्यानंतरची आत्तापर्यंतची वाटचाल पाहा. आत्ता मी स्वतः मुख्यमंत्री आहे. माझ्यासोबत जे काही सहकारी मंत्रिमंडळात आहेत तेदेखील त्याच बाळासाहेबांचे सहकारी आहेत. बाळासाहेबांचीच शिवसेना हवी असं म्हणणाऱ्यांनी जे काही मधल्या काळात मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं हे लक्षात ठेवा असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.''

''काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही माझ्यावर विश्वास दाखवला. अशात मी माझ्या लोकांना म्हणजेच शिवसेनेतल्याच लोकांना मी नको असेन तर काय करायचं? उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी नकोत असं सांगितलंत तर मी आत्ता राजीनामा द्यायला तयार आहे. तुमचा विश्वास नसेल तर मी आजच माझा मुक्काम वर्षा निवासस्थानावरून मातोश्रीवर हलवतो. जे काही बोलायचं आहे ते समोर येऊन बोला, आडून आडून का बोलायचं आहे. असे प्रश्न आज उद्धव ठाकरे यांनी विचारले आहेत.''

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in