
मुंबई: 'आम्हाला कुणाच्या पाठीत सुरा खुपसता येत नाही. मग ते कोणीही असू द्या. आम्ही कधी सत्तेची पर्वा केली नाही आणि आम्ही कधी शरणार्थी म्हणून जगलो नाही. स्वाभिमानाने जगू..', अशी रोखठोक प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमधून स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास हा विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरु झाला आहे. याच ट्विटनंतर अरविंद सावंत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पाहा अरविंद सावंत नेमकं काय म्हणाले:
'मला वाटतं ज्या पद्धतीने चाललं आहे ते सगळं स्पष्टपणे दिसतं आहे. कशा पद्धतीने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांनी रेड केलेली सगळी माणसं तिथे आहेत. पण जे कट्टर आहेत ते शिवसेनेबरोबर आहेत. शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून नार्वेकर गेले होते. त्यांनी शिंदेंशी चर्चा केली. स्वत: उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलले. त्यांना सांगितलं देखील हा जो काही वाद आहे तो घरातला आहे.' असं अरविंद सावंत यावेळी म्हणाले.
'तुम्ही इकडे या आपण चर्चा करु. पण तुम्ही आम्हाला सांगता आहात की, भाजपसोबत जा.. असा एक प्रकारचा वेगळा निर्देशच ते देत आहेत. मला कल्पना नाही की, अशा प्रकारचे आदेश पक्षाचे प्रमुख देणार की, आपण देणार?' असा सवाल अरविंद सावंत यांनी विचारलं आहे.
'ज्यांनी शब्द दिला होता त्यांनी पाळला नव्हता म्हणून आम्ही हे सरकार स्थाापन केलं होतं. हे सगळं काही शिंदेंना माहित नव्हतं का?' असा सवालही शिंदेंना विचारला आहे.
'आम्हाला कुणाच्या पाठीत सुरा खुपसता येत नाही. मग ते कोणीही असू द्या. आम्ही आणखी 24 तास वाट पाहू. त्यांचं सगळं प्लॅन आहे. हे काही एवढं सोप्पं आहे का? हे काय एका दिवसात घडतं का? हे सगळं पूर्वीपासून प्लॅन आहे. तुम्ही विचार करा की, गुजरातमध्ये संबंध राज्याचे पोलीस तुम्हाला आडवत होतं. महाराष्ट्रातील एक गाडी जाऊ देत नव्हते. हे सगळे ठरलेलं होतं. नार्वेकरांना भेट देण्यासाठी किती वेळ लावला हे आपणही पाहिलं असेल.' असं म्हणत अरविंद सावंत यांनी हा सर्व पूर्वनियोजित कट असल्याचं म्हटलं आहे.
'आम्ही कधी सत्तेची पर्वा केली नाही आणि आम्ही कधी शरणार्थी म्हणून जगलो नाही. स्वाभिमानाने जगू.. स्वाभिमान नाव ठेवून गहाण नाही ठेवला स्वाभिमान कधी. मूठभर मावळे घेऊन पुन्हा-पुन्हा राखेतून उभारी घेऊ. असे प्रसंग शिवसेनेने खूपदा पाहिले आहेत.' असा विश्वासही अरविंद सावंत यांनी व्यक्त केला आहे.
'शिवसेना ही आमदारांमुळे नाहीए. शिवसेना ही शिवसैनिकांमुळे आहे. शिवसेना निष्ठावंत आहे. ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत.' असंही अरविंद सावंत यांनी ठणकावून सांगितलं आहे.