ज्यांचा पक्षच ‘डेड’ झालाय ते काय ‘डेडलाईन’ देणार? संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून भोंगे आणि हनुमान चालीसा यांचं राजकारण तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भातली घोषणा केली. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान चालीसा मातोश्री समोर म्हणणार असं आव्हान दिलं होतं. दोघांनाही अटक झाली. अशात महाराष्ट्रात काय स्थिती काय आहे? हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेकडून हायजॅक केला जातो आहे का? हा प्रश्नही विचारला जातो आहे. यावर संजय राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.

राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा अर्थ काय?

हिंदुत्वाची माहिती मिळालेले हे नवे हिंदू आहेत. आम्ही जेव्हा हिंदुत्वाचा नारा दिला होता, त्यावेळी हे देशात इतर प्रश्न नाही का? असा प्रश्न विचारत होते. यांचं एक दुकान चाललं नाही, त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणला गेला आहे. त्यांना भाजपने पूर्ण पाठिंबा दिला आहे असं म्हणत राज ठाकरेंवर शिवसेनेवर टीका केली आहे. हिंदू ओवेसी तयार करून आमची मतं कुणी खाईल आणि आमचं नुकसान करेल असं कुणाला वाटत असेल तर त्यांनी गैरसमज काढून टाकावा असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज ठाकरे यांनी डेडलाईन दिली आहे असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले की ज्यांचा पक्षच डेड झाला आहे त्यांच्या डेडलाईनला काय अर्थ आहे? त्यामुळे राज ठाकरेंना महत्त्व देण्याची गरज नाही.

ADVERTISEMENT

रस्त्यावर नमाज चालू देणार नाही हा नारा सर्वात आधी बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर ९५ मध्ये जेव्हा शिवसेना-भाजपची सत्ता आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी मुल्ला-मौलवींना बोलावलं आणि विचारलं की रस्त्यावरचे नमाज कधी बंद करणार? त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्हाला ते शक्य नाही. त्यानंतर बाळासाहेबांना या सगळ्यांनी सांगितलं की आमच्या मशिदी छोट्या आहेत त्यामुळे आम्हाला रस्त्यावर नमाज अदा करावी लागली. त्यानंतर मशिदींना एफएसआय वाढवून दिला गेला आणि रस्त्यावरचे नमाज बंद झाले.

ADVERTISEMENT

आता प्रश्न उरला तो भोंग्यांचा. सुप्रीम कोर्टाने प्रार्थना स्थळांबाबत जे निर्देश दिले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सगळं सुरू आहे. आम्ही कोणताही नियम मोडलेला नाही. नियम मोडला की कारवाई होते हे लोकांना माहित आहे.

योगी आणि भोगी यावरून तुमच्यावर टीका होते आहे? असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, राज ठाकरेंकडे फार लक्ष देऊ नका, त्यांना महत्त्व देऊ नका. योगी आदित्यनाथांचा उल्लेख ठग, टकलू असा राज ठाकरेंनी वारंवार केला होता. आता अचानक त्यांना योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आदर वाटू लागला आहे. योगी आदित्यनाथ हिंदू धर्मासाठी काम करत आहेत, विकासाचं काम करत आहेत. आम्ही त्यांचा विरोध करत असलो तरीही व्यक्तीगत टीका आम्ही केला नाही.

राज ठाकरे अयोध्येला जात आहेत त्याबद्दल काय सांगाल? त्यांना अयोध्येला जायचं असेल तर खुशाल जाऊ देत. अयोध्या, काशी, मथुरा सगळीकडे जाऊदेत. नवं हिंदुत्व स्वीकारलं आहे त्यांनी त्यामुळे त्यांना ते करणं अपरिहार्य आहे. नव्याने मुस्लिम धर्मात आलेला माणूस दहावेळा नमाज अदा करतो, जोरात बांग देतो तसाच हा प्रकार आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या हनुमान चालीसा म्हणण्यावर आम्हाला आक्षेपच नाही. त्यांनी त्यांच्या घरात म्हणावं ना काय हवं ते म्हणा. एखाद्याच्या घरासमोर जाऊन हे करणं चुकीचं आहे. राजद्रोहाचा गुन्हा त्यांनी जे वातावरण बिघडवलं आहे त्यामुळे लावण्यात आला आहे. तो राजद्रोहाचा गुन्हा हनुमान चालीसा म्हणणार यासाठी नाही. राजद्रोहाच्या कायद्यात सुधारणा झाली पाहिजे असं मला वाटतं. देशद्रोहाचं कलम लावायला सुरूवात कुणी केली? गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांच्या विरोधात हे कलम लावलं गेलं. जिग्नेश मेवाणीलाही उगाच अटक करण्यात आलं आहे. आमचं सरकार असं नाही.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा भीमा कोरेगाव प्रकरणात किती लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आपल्याला माहित आहे. नवनीत राणा आणि रवी राणा हे बोगस सर्टिफिकेटच्या जिवावर निवडून आले आहेत असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आम्हाला जर कुणी आव्हान दिलं की मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालीसा म्हणू तर आम्ही गप्प बसणार नाही, शिवसेना गप्प बसणार नाही. सरकार असो किंवा नसो आम्ही मातोश्रीबाबत कुणी काही बोललं तर शिवसैनिक आव्हान स्वीकारणारच असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT