
मुंबई: भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं वजन आणि बाबरी मशिद यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या (14 मे) भाषणात टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी आज (15 मे) प्रत्युत्तर दिलं. यावेळी देवेंद्र फडणवीस हे प्रचंड चिडलेले दिसून आले.
'तुम्ही जर का देवेंद्र तिकडे खरंच गेला होतात ना तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता ना तर नुसत्या तुमच्या वजनानेच बाबरी खाली आली असती. म्हणजे लोकांना श्रमच करावे लागले नसते. तुम्ही नुसता प्रयत्न.. एक पाय टाकला असता तर बाबरी खाली आली असती.' अशी टीका उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. ज्याला आता देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
'काल चांगलं झालं काय म्हणाले उद्धवजी देवेंद्र फडणवीस यांनी पाय ठेवला असता तरीही बाबरी खाली आली असती. केवढा विश्वास आहे माझ्यावर बघा. मी तुम्हाला सांगतो. कशाला लपवायचं.'
'आज माझं वजन 102 किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होतं. पण उद्धवजींना ही भाषा नाही समजत तेव्हा त्यांच्या भाषेत सांगतो. सामान्य माणसाचा एफएसआय जर 1 असेल तर माझा एफएसआय 1.5 आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो तेव्हा तर माझा एफएसआय 2.5 होता.'
'उद्धवजी तुम्हाला असं वाटतंय की, माझ्या पाठीत खंजीर खूपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी करु शकाल तर लक्षात ठेवा हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय थांबणार नाही.'
'लक्षात ठेवा.. बाळासाहेब ठाकरे हे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. उद्धवजी त्याच मैद्याच्या पोत्याच्या पायावर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालात. वजनदार लोकांपासून सांभाळून राहा.'
'जेवढं वजन वर दिसतंय ना त्यापेक्षा वजन खाली आहे. खरं म्हणजे कोणी तरी ट्विट केलं वाघ. अरे त्यांना समजून सांगा की, वाघाचे फोटो काढले तर वाघ होता येत नाही.'
'वाघ व्हायचं असेल तर निधड्या छातीने आव्हानांचा सामना करायचा असतो. तेव्हा वाघ होता येतं. नुसती फोटोग्राफी करुन कोणाला वाघ होता येत नाही. कुठला सामना केलात तुम्ही? कुठल्या आंदोलनात तुम्ही होता?' असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.