
अडीच वर्षे महाविकास आघाडीने उत्तम कारभार केला. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोनाचं संकट असताना जे काही काम केलं आहे ते पाहता महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग फसला हे म्हणणं गैर आहे. आत्ता जे महाराष्ट्रात घडलं आहे त्यात आमदारांना राज्याबाहेर घेऊन जाण्यात आलं आहे. ते आमदार जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा चित्र स्पष्ट होईल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात अशी स्थिती मी आधीही पाहिली आहे. हे सरकार बहुमत सिद्ध करेल आणि उद्धव ठाकरेंचं सरकार सुरू आहे हे देशाला समजेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. मंत्री, आमदार हे राज्याबाहेर कसे गेले हे कुणाला समजलं नाही हे अपयश आहे की नाही हे स्पष्ट करण्याची ही वेळ नाही. राजकीय भूकंपावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीची बैठक मुंबईत पार पडली. त्यानंतर शरद पवार यांनी हे भाष्य केलं आहे. सुरत, आसाममध्ये आमदारांची व्यवस्था करणारे लोक दिसले ते आम्हाला दिसले आहेत ते भाजपशी संबंधित आहेत. भाजपनेच त्यांना ऑफर दिली आहे हे वेगळं कशाला सांगायला हवं असाही प्रश्न शरद पवार यांनी विचारला आहे.
आसाममध्येही भाजपचं सरकार आहे, तिथे आमदारांना पाठिंबा कोण देतंय ते स्पष्ट झालंच आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. आसाममध्ये बसून काय ते बोलू नका इथे या. त्यानंतर काय म्हणणं मांडायचं ते मांडा तेव्हा बहुमत सिद्ध होईल. एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र ते ज्यासाठी नाराजी आहे ती वस्तुस्थिती घेतलेली नाही. त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याचे परिणाम या बंडखोर आमदारांना भोगावे लागतील म्हणून आता काँग्रेस-राष्ट्रवादीला दोष देत आहेत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ हे जेव्हा शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले होते तेव्हा एक सोडून बाकी सगळ्यांचा पराभव झाला होता. आत्ता जे लोक आसाममध्ये गेले आहेत त्यांच्याबाबत ही स्थिती येऊ शकते. निधीचा विषय यासाठीच पुढे केला जातो आहे बाकी त्याला काहीही अर्थ नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.