शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा कधी झाला होता? बाळासाहेब ठाकरे तेव्हा काय म्हणाले होते?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेचा दसरा मेळावा हा कायमच चर्चेत राहिला आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्याची परंपरा ही बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली होती. मात्र आज बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरेंनी फारकत घेतली असा आरोप करत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या ४० आमदारांनी बंड पुकारलं. त्यामुळे शिवसेना दुभंगली आहे.

शिवसेना दोन गटात विभागली गेल्याने यंदा शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होत आहेत. पहिला मेळावा आहे तो अर्थातच शिवाजी पार्क या मैदानावर होणारा उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा आणि दुसरा आहे तो बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. मात्र पहिला दसरा मेळावा कधी साजरा झाला होता? हा किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

५६ वर्षांपूर्वी साजरा झाला होता पहिला दसरा मेळावा

३० ऑक्टोबर १९६६ या दिवशी शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा पार पडला. १९ जानेवारी १९६६ ला बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. त्यानंतर आलेला हा पहिलाच दसरा मेळावा. त्यावेळी आपल्या शिवसैनिकांना साथीला घेऊन दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला. जाहीर सभा, मेळावे याऐवजी शिलंगणाचं सोनं लुटण्याचं निमंत्रण मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी दिलं.

ADVERTISEMENT

शिवसेनेच्या स्थापनेनंतरचा पहिलाच दसरा मेळावा

शिवसेनेच्या स्थापनेनंतरचा पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ ला झाला. वर्तमानपत्रांनी या मेळाव्याला मुळीच प्रसिद्धी वगैरे दिलेली नव्हती. मार्मिकने आधीच्या तीन चार महिन्यात उभा केलेला माहोल शिवसेना या संघटनेच्या पाठिशी होता. त्यामुळे या मेळाव्यासाठी दुपारी चार वाजल्यापासून शिवाजी पार्कच्या दिशेने लोकांची गर्दी येऊ लागली. छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि शिवसेनेचा जयजयकार असो या घोषणा दिल्या जात होत्या.

ADVERTISEMENT

पहिल्या दसरा मेळाव्यात स्टेजवर कोण होतं?

शिवसेनेच्या नेत्यांपैकी एकही जण पहिल्या दसरा मेळाव्याच्या स्टेजवर नव्हतं. बाळासाहेब ठाकरे हे मेळाव्याच्या अग्रभागी होते. त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांच्या साथीने स्थापन केलेल्या या संघटनेला आशीर्वाद देण्यासाठी प्रबोधनकार ठाकरेही जातीने उपस्थित होते. त्याशिवाय पुढे काँग्रेसमध्ये गेलेले आणि मंत्री झालेले रामराव आदिकही होते. अॅडव्होकेट बळवंत मंत्री आणि प्राध्यापक स.अ. रानडे हे सगळेही होते.

शाहीर साबळे यांचं महाराष्ट्रगीत

शाहीर साबळे यांनी आपल्या बुलंद आवाजात महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे सुरू केलं. तोपर्यंत संपूर्ण शिवाजी पार्क मैदान गर्दीने फुलून गेलं होतं. महाराष्ट्राला आज खरी गरज आहे ती महाराष्ट्रवादाची! या शब्दात बाळासाहेब ठाकरेंनी भाषण सुरू केलं ज्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला.

शिवसेनेचं धोरणही बाळासाहेब ठाकरेंनी केलं जाहीर

पहिल्याच दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचं धोरणही सांगितलं. “आज महाराष्ट्राला राजकारणापेक्षा समाजकारणाची गरज आहे. त्यामुळे शिवसेना स्वतःला राजकारणापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेते आहे” असं बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर करत संघटनेचं धोरण जाहीर केलं. तसंच राजकारण हे गजकरणासारखं आहे असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले आणि एकच हशा पिकला. ही संघटना जातीयवादी नाही, कारण मराठी माणसाशी संकटकाळातही जो मैत्री करतो तोच मराठी असंही वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या दसरा मेळाव्याच्या पहिल्या भाषणात केलं.

प्रबोधनकार ठाकरे यांनीही केलं भाषण

“आपल्याला शिवरांयांचं नाव घेऊन संकटांशी मुकाबला करायचा आहे. मराठी रक्त भ्रष्ट नाही, मराठी माणूस हा अन्यायाशी झगडायला तयार आहे हे आज तुम्ही दाखवून दिलं आहे. तसंच मराठी माणसाने आपसात भांडू नये” असाही सल्ला प्रबोधनकार ठाकरे यांन दिला. त्यापुढे प्रबोधनकार यांनी उच्चारलेलं वाक्य महत्त्वाचं होतं. “इतके दिवस हा बाळ ठाकरे कुटुंबीयांचा होता. आज बाळ मी तुम्हाला दिला” असं प्रबोधनकार ठाकरे म्हणाले आणि महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने हिंदूहृदय सम्राट मिळाले.

(दसरा मेळाव्याविषयीचा संदर्भ प्रकाश अकोलकर लिखित जय महाराष्ट्र या पुस्तकातून साभार)

    follow whatsapp

    ADVERTISEMENT