
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेमुळे राज्यातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलेलं आहे. मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा आणि हिंदुत्वाची कास धरलेल्या राज ठाकरेंनी आता भाजपबद्दल नरमाईची भूमिका घेत थेट शिवसेनेला आव्हान दिलं आहे.
अशा परिस्थितीत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा या अधिकृत निवासस्थानी शिवसेना नेते आणि प्रवक्ते यांची एक बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे आणि भाजपवर टीका करत आपल्या नेत्यांना त्यांच्यावर थेट तुटून पडण्याचा गुरुमंत्र दिला आहे.
बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेचं काय सुरु होतं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी बैठकीत उपस्थित केला. यादरम्यान त्यांनी भाजपकडून करण्यात आलेल्या विविध आरोप आणि टीकेवरुनही सेना प्रवक्त्यांना सूचना दिल्या. याचसोबत आरोप करणाऱ्या भाजपच्या प्रवक्तांवर तुटून पडा. सगळ्यांना सडेतोड उत्तर द्या. यांचं हिंदुत्व कसं बोगस आहे हे सगळ्यांना दाखवा. आपली कामं लोकापर्यंत पोहचवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत नेत्यांना दिल्या आहेत.
वर्षा बंगल्यावर आज झालेल्या बैठकीला संजय राऊत, अरविंद सावंत, निलम गोर्हे, प्रियंका चतुर्वेदी, सचिन आहीर, सुनील प्रभू, किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे, शुभा राऊळ, किशोर कान्हेरे, संजना घाडी, आनंदराव दुबे, किशोर तिवारी, हर्षल प्रधान, विनायक राऊत, ओमराजे निंबाळकर, अनिल देसाई, हेमंत पाटील, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, संजय महाडीक, भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे या नेत्यांची उपस्थिती होती.
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेकडून वारंवार शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशावेळी सत्तेत महत्वाचा आणि प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेकडूनही आगामी काळात आपल्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाणार असं दिसत आहे.