Graduate-Teacher Constituency of Vidhan Parishad Election: मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) 30 जानेवारी 2023 रोजी विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) 5 जागांसाठी निवडणूक (Election) होणार आहे. पण विधान परिषदेच्या निवडणुका या काही लोकसभा-विधानसभा निवडणुकांप्रमाणे होत नाहीत. शिवाय जसं विधानसभेच्या सरसकट सगळ्या जागांसाठी एकाच वेळी निवडणूक होते, तसं विधान परिषदेच्या बाबतीत होत नाही. शिक्षक-पदवीधर, राज्यपालनियुक्त असे वेगवेगळे प्रकार आहेत, आणि त्यांची निवडणूक प्रक्रियाही वेगवेगळी असते. ही प्रक्रिया कशी असते, विधान परिषदेवर आमदार कसे निवडून जातात? आणि आता लागलेली शिक्षक-पदवीधर (Graduate-Teacher Constituency) विधान परिषद निवडणूक म्हणजे काय? हेच आपण सविस्तर जाणून घेऊया.
देशात 6 राज्यांमध्येच विधान परिषद आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. राज्याच्या निर्मितीपासून जरी विधान परिषद नसली तरी ती नव्याने आणता येते, आणि एखाद्या राज्यात असलेली विधान परिषदही संपुष्टातही आणता येते. पंजाब, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्यांमध्ये असं घडलं आहे. याशिवाय जम्मू आणि काश्मिरमध्येही विधान परिषद अस्तित्वात होती, मात्र केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे ती संपुष्टात आली.
विधान परिषदेच्या आमदाराचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होत असतात आणि त्यांच्या जागी नव्या आमदारांसाठी निवडणूक होते.
विधान परिषदेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ही त्या राज्याच्या विधानसभेच्या सदस्य संस्थेपेक्षा एक तृतीयांश असू शकते. आणि किमान सदस्यसंख्या ही 40 असते. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सदस्यसंख्या ही 78 आहे.
विधान परिषदेत 78 सदस्य असतात. यापैकी 31 सदस्य विधानसभेतील आमदार निवडून देतात. तर 21 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून जातात. तर 12 सदस्यांची निवड राज्यपाल करतात. 7 सदस्य शिक्षक मतदार संघातून तर 7 सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडून जातात.
दोन पदवीधर आणि तीन शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण 5 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार 30 जानेवारीला मतदान होणार असून 2 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.
पाच मतदारसंघात सध्या कोण आहेत आमदार?
नाशिक पदवीधर मतदारसंघात सध्या काँग्रेसचे सुधीर तांबे हे आमदार आहेत.
अमरावती पदवीधर मतदारसंघात सध्या भाजपचे रणजित पाटील हे आमदार आहेत.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे हे आमदार आहेत.
कोकण शिक्षक मतदारसंघात सध्या शेकापचे बाळाराम पाटील हे आमदार आहेत.
नागपूर शिक्षक मतदारसंघात सध्या अपक्ष नागो गाणार हे आमदार आहेत.
शिक्षक-पदवीधर मतदारसंघातील निवडणूक नेमकी कशी होते?
शिक्षक आणि पदवीधरांना विधीमंडळात प्रतिनिधित्व देण्यासाठी हे आमदार विधान परिषदेवर निवडून येतात. 7 आमदार शिक्षक मतदारसंघातून तर 7 आमदार हे पदवीधर मतदारसंघाचे असतात.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत माध्यमिक-सेंट्रल स्कूल, डिग्री कॉलेज, मेडीकल कॉलेज, पॉलिटेक्निक आणि इंजिनियरिंग कॉलेजचे शिक्षक मतदान करू शकतात. कमीत कमी 3 वर्ष शिकवण्याचा अनुभव असलेलेच मतदान करू शकतात. निवृत्त झालेले शिक्षकही निवृत्तीनंतर 3 वर्षापर्यंत मतदान करू शकतात.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पदवी मिळून 3 वर्ष झालेले मतदार मतदान करण्यासाठी पात्र असतात.
महत्वाचं म्हणजे मतदारांसाठी या अटी असल्या तरी उमेदवारांसाठी कोणत्याही अटी नाही. कोणीही पदवीधर-शिक्षक असो वा नसो या निवडणुकीला उभा राहू शकतो. शिक्षणाचीही अट यात नाही.
*महाराष्ट्रात कुठून पदवीधर-शिक्षक आमदार विधानपरिषदेवर जातात?
मुंबई, कोकण, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि अमरावती हे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात येतात. मतदान हे त्या विभागातील नोंदणीकृत मतदार करू शकतात.
शिक्षक आणि पदवीधरांच्या समस्या विधिमंडळात मांडल्या जाव्यात त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ तयार करण्यात आले आहेत.
या निवडणुकीतही preferential voting म्हणजेच राज्यसभा, राष्ट्रपती निवडणुकीत, गेल्या वर्षी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ज्या पद्धतीने प्राधान्यक्रम देऊन मतदान केलं जातं, तसंच मतदान याही निवडणुकीत होतं.