
राकेश गुडेकर, रत्नागिरी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यात झालेल्या भाषणानंतर आता शिवसेना प्रवक्ते आमदार भास्कर जाधव यांनी काहीशी वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हे भाषण सर्वांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. असं म्हणत भास्कर जाधव यांनी महाविकास आघाडीच्या विनंती वजा आवाहन केलं आहे. ते आज चिपळूणमध्ये बोलत होते.
भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
'राज ठाकरे यांचं कालचं भाषण हे सर्वांनी गांभीर्याने घेण्याची गरज'
'राज ठाकरे यांचं कालचं भाषण हे पूर्णपणे मक ऐकलं. राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणामध्ये अनेक अर्थ दडलेले आहेत. राज ठाकरे यांचं कालचं भाषण हे सर्वांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.'
'विशेष करून महाविकास आघाडीच्या सर्वच लोकांना मी विनंती वजा आवाहन करेन, की कालचं राज ठाकरे यांचं भाषण आणि त्यांचा रद्द झालेला दौरा याला कुणीही हवा देण्याचं काम करू नये, कोणीही चेष्टेचा विषय करू नये.'
'तसेच राज ठाकरे यांनी जे भाषण केलं ते खूप राजकीयदृष्ट्या प्रगल्भतेने आणि राजकियदृष्ट्या अतिशय वैचारिक पद्धतीने ते भाषण घेण्याची गरज आहे आणि परिपक्व राजकीय भाषण म्हणून त्या भाषणाकडे पाहण्याची आवश्यकता आहे.' असं भास्कर जाधव यावेळी म्हणाले.
'भाजपने काढलेली नखं ही राज ठाकरेंनी वेळीच ओळखली'
'भारतीय जनता पक्षाच्या एका बृजभूषण सिंह खासदाराला तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गप्प करू शकत नव्हते का? हे ते बोलले, आणि महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली याचा अर्थ कोणीही आपल्या अंगावर घेण्याची गरज नाही, तर यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, त्याचबरोबर भाजपाचं खरं रूप काय आणि त्यांनी काढलेली नखं ही राज ठाकरेंनी वेळीच ओळखली. त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगतोय की हे भाषण अतिशय राजकीय प्रगल्भतेने घेण्याची गरज आहे.'
'भारतीय जनता पार्टी जी बी टीम, सी टीम करत होती, तीच सी टीम भाजपापासून वेगळी करण्याची संधी आलेली आहे. अशा अर्थाने ते भाषण पाहिलं पाहिजे. राज ठाकरे यांना हिणवण्याकरता या भाषणाकडे बघितलं नाही पाहिजे.' असं भास्कर जाधव यावेळी म्हणाले.
'एमआयएमच्या अध्यक्षांनी सांगितलं होतं, राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर मुस्लिम समाजाने कोणत्याही प्रकारे व्यक्त होऊ नये. याचा अर्थ खूप मोठा आणि खोल आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांनी जो दौरा रद्द केला आहे त्याची चेष्टा, खिल्ली उडवणे हे न पाहता त्यातलं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे.' असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आलं आहे. याआधी राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे, अजान, हनुमान चालीस आणि अयोध्या दौरा असे मुद्दे हाती घेतल्यानंतर राज ठाकरेंवर महाविकास आघाडीने जोरदार टीका केली होती.
राज ठाकरे यांची मनसे भाजपची सी टीम आहे असं देखील शिवसेनेनं म्हटलं होतं. मात्र, राज ठाकरेंनी आपला अयोध्या दौरा रद्द केल्याने आता शिवसेना पुन्हा राज ठाकरेंना चुचकारण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं आहे.