
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं एक वक्तव्य (Speech )सध्या चर्चेत आहे. भरूच येथील कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आपल्याला एका ज्येष्ठ नेत्याने एक उपदेश दिल्याचं मोदींनी म्हटलं आहे. त्यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. भाजपची सत्ता देशावर येऊन आठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याबाबत सांगत असताना लोकांचा विकास हेच आमचं ध्येय आहे असं मोदींनी या कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटलं आहे. त्याचवेळी ही आठवणही सांगितली आहे.
नेमकं काय म्हणाले आहेत नरेंद्र मोदी?
"लोकांच्या आशीर्वादानेच आम्ही सत्तेवर आहोत. आज देशात आमच्या सरकारची आठ वर्षे पूर्ण होत आहेत. आठ वर्षे पूर्ण होत असताना आम्ही एका नव्या संकल्पासह, नव्या उर्जेसह पुढे तयारी करत आहोत. मला एक दिवशी एक खूप मोठे नेते भेटले होते.ते वरिष्ठ नेते आहेत. ते आमचे आमचा राजकीय विरोधही करतात. ते आमचे राजकीय विरोधक आहेत. मात्र मी त्यांचा आदर करतो. त्यांना काही कारणामुळे नाराजी होती. त्यामुळे ते मला भेटायला आले आणि म्हणाले की मोदीजी, आता काय करायचं आहे तुम्हाला? देशाने तुम्हाला दोनदा पंतप्रधान होण्याची संधी दिली. आता तुम्हाला आणखी काय हवं? त्यांना वाटतं की दोनदा मी पंतप्रधान झालो म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. मात्र त्यांना माहित नाही की मोदी वेगळ्या मातीचा माणूस आहे. गुजरातच्या मातीने मला तयार केलं आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ विरोधकाचा उल्लेख आपल्या संबोधनात केला आहे. दोनदा पंतप्रधान झालात तेवढं पुरे झालं असं नेमकं त्यांना कोण म्हणालं असेल? याची चर्चा आता रंगली आहे. त्यांचा हा रोख शरद पवारांकडे आहे का? अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला विरोध करणाऱ्या एका ज्येष्ठ नेत्याने असं म्हटलं आहे. तसंच मी त्यांचा आदर करतो असंही म्हटलं आहे. त्यामुळे ते नेते शरद पवार तर नाहीत ना? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पुढे मोदी म्हणाले, "जे झालं, दोनदा पंतप्रधान झालो आता आराम करा असं नाही. माझं स्वप्न आहे की आपला देश पुढे गेला पाहिजे. २०१४ मध्ये पहिल्यांदा आम्हाला सेवेची संधी दिली होती तेव्हा देशातल्या जवळपास अर्धी जनता ही शौचालयाच्या सुविधेपासून, लसीकरणाच्या, वीज, बँक अकाऊंट या सुविधांपासून वंचित होती. मात्र या आठ वर्षांमध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक योजना पूर्ण होत आल्या आहेत. आता आठ वर्षे पूर्ण होत असताना पुन्हा एकदा कंबर कसून सगळ्यांना घेऊन पुढे जायचं आहे. प्रत्येक गरजवंताला, प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावायचं आहे. मी राजकारण करण्यासाठी नाही तर देशाची सेवा करण्यासाठी आलो आहे." असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरूच येथील कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटलं आहे.