BCCI चा दिवाळी धमाका, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची नियुक्ती

टी-२० वर्ल्डकपनंतर सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्रींचा कार्यकाळ समाप्त
BCCI चा दिवाळी धमाका, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची नियुक्ती
फोटो सौजन्य - Getty Images

टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या पहिल्या दोन सामन्यांत खराब कामगिरीमुळे नाराज झालेल्या चाहत्यांना बीसीसीआयने आनंदाची बातमी दिली आहे. द वॉल या नावाने ओळखला जाणारा भारताचा माजी खेळाडू राहुल द्रविडची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन याची घोषणा केली आहे.

रवी शास्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा कार्यकाळ सध्या सुरु असलेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर संपुष्टात येणार आहे. विराटप्रमाणे रवी शास्त्रींचा कोचिंग स्टाफ आपल्या कारकिर्दीत संघाला मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद मिळवून देण्यात अयशस्वी ठरला होता. त्यामुळे भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल होणार हे निश्चीत मानलं जात होतं. राहुल द्रविडने ही जबाबदारी स्विकारावी यासाठी बीसीसीआय गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्नशील होतं.

सुरुवातीला राहुल द्रविड ही जबाबदारी स्विकारण्यासाठी तयार नव्हता. परंतू अखेरीस त्याची मनधरणी करण्यात बीसीसीआयला यश आलं. राहुल द्रविडचा होकार आल्यानंतर बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी जाहीराती काढल्या होत्या.

बीसीसीआयने या पदासाठी जाहीरात जरी काढली असली तरीही ही जबाबदारी द्रविडच्या खांद्यांवर येणार हे निश्चीत मानलं जात होतं आणि अपेक्षेप्रमाणे बीसीसीआयने याबद्दलची घोषणा केली आहे. सुलक्षणा नाईक आणि आर.पी.सिंग यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने राहुल द्रविडच्या नावावर एकमताने कौल दिला आहे. न्यूझीलंड संघाच्या आगामी दौऱ्यापासून राहुल द्रविड आपली जबाबदारी सांभाळणार आहे. त्यामुळे द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आगामी दौऱ्यांमध्ये कशी कामगिरी करते याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in