
आयपीएलचा पंधरावा हंगाम हा सर्वांसाठी धक्कादायक ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखले जाणारे मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही संघ यंदा पॉईंट टेबलमध्ये तळाशी आहेत. त्यातच दिल्लीच्या संघात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
दिल्लीच्या संघाचे फिजीओ पॅट्रीक फराहत यांना कोविडची लागण झाल्यानंतर सध्या ट्विटरवर Cancel IPL हा हॅशटॅग ट्रेंडिंग होतो आहे. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघाची यंदाच्या हंगामात निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी दिल्लीच्या गोटात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर स्पर्धा रद्द करा म्हणत मजेदार मिम्स शेअर केले आहेत.
पाहा नेटकऱ्यांनी शेअर केलेले भन्नाट आणि मजेशीर मिम्स...
मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांचे संपूर्ण देशभरात असंख्य चाहते आहेत. परंतू यंदा हे दोन्ही संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडल्यामुळे यंदाच्या हंगामात आयपीएलची व्ह्युअरशीपही कमी झाल्याचं पहायला मिळतंय.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंतच्या सामन्यात संघाच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्विकारली आहे. दुसरीकडे चेन्नईने एक सामन्यात विजय मिळवला असला तरीही त्यांची अन्य सामन्यांमधली कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे.
आतापर्यंत झालेल्या सहा आयपीएल सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला सहा सामन्यांत पराभव स्विकारावा लागला असून चेन्नईचा संघ आतापर्यंत अवघा एक सामना जिंकू शकला आहे. यंदाचा आयपीएल हंगाम 10 संघांनिशी खेळवला जात असून नव्याने दाखल झालेले गुजरात आणि लखनऊ हे संघ सध्या गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.