
भारत इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यातच कोरोना विघ्न आणलं. भारतीय स्टाफमधील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानं सामना खेळवण्याबद्दल साशंकता असतानाच आता दोन्ही मंडळांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सामना सुरू होण्यात काही तास उरले असताना हा निर्णय घेण्यात आला.
भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पाचवा कसोटी सामना नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार की नाही, याबद्दल साशंकता होती. मात्र, सर्व खेळाडूंचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं सामना होण्याची आशा होती. पण इंग्लंड क्रिकेट बोर्ड व भारतीय क्रिकेट बोर्डाने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघाचे सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं बुधवारी सायंकाळी निष्पन्न झालं. परमार यांना लागण झाल्याचं समोर आल्यानंतर भारतीय खेळाडूंना विलगीकरणा ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर भारतीय खेळाडूंच्या दोन RT-PCR चाचण्याही करण्यात आल्या. सर्व खेळाडूंचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे पाचवा सामना नियोजित वेळेप्रमाणे सुरू होणार असल्याचं बोललं जात होतं.
दरम्यान, पाचवा कसोटी सामना सुरू होण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असतानाच इंग्लंड क्रिकेट मंडळ व भारतीय क्रिकेट मंडळाने सहमतीने आजपासून होणारा पाचवा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
परमान यांना कोरोना संसर्ग होण्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, फिजिओ नितीन पटेल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. ओव्हलमध्ये झालेल्या कसोटी सामन्याच्या दरम्यान रवि शास्त्री एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणं दिसून आली होती.
इंग्लंड क्रिकेट मंडळानं काय म्हटलं?
भारत-इंग्लंड यांच्यातील सामना कसोटी सामना रद्द झाल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट मंडळाने एका निवेदनाद्वारे दिली आहे. बीसीसीआयसोबत झालेल्या चर्चेत ओल्ड ट्रॅफोर्ड येथे खेळवला जाणारा सामना रद्द करण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या स्टाफमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याची भीती असून, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय संघ आपल्या खेळाडूंची तयार करू शकली नाही, असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.