जेऱ्हाड रॅच, रोलांट ओल्टमन्स ते ग्रॅहम रिड…जाणून घ्या Hockey India च्या जडणघडणीत परदेशी कोचचं योगदान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने पदकांचा दुष्काळ संपवत हॉकीमध्ये पदकाची कमाई केली. कांस्यपदकाच्या लढाईत भारताने जर्मनीवर ५-४ अशी मात करत सामना जिंकला. १९८० साली अखेरचं ऑलिम्पिक पदक जिंकलेल्या भारतीय हॉकी संघाला नंतरची ४० वर्ष खडतर काळातून जावं लागलं. काही महत्वाच्या स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी चांगली होत होती. परंतू ऑलिम्पिक पदकांची भारताची पाटी कोरीच होती.

भारतीय हॉकी संघाच्या यशात ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक ग्रॅहम रिड यांचा मोलाचा वाटा मानला जात आहे. आतापर्यंत भारतीय हॉकी संघाच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या परदेशी प्रशिक्षकांच्या कामगिरीवर एक नजर…

२००४ अथेन्स ऑलिम्पिकदरम्यान भारतीय हॉकी संघासाठी पहिल्यांदा परदेशी प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली. अथेन्स ऑलिम्पिकसाठी हॉकी इंडियाने जेऱ्हाड रॅच तर पाकिस्तानी हॉकी संघाने रोलांट ओल्टमन्स यांची नेमणूक केली. यानंतर हॉकी इंडियात परदेशी प्रशिक्षकांच्या नेमणुकीचा सिलसिला सुरु राहिला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

BLOG : ४१ वर्षांच्या राखेतून भारतीय हॉकीची Olympics मध्ये ‘फिनीक्स’भरारी

१) जेऱ्हाड रॅच – हॉकी इंडियाचे पहिले परदेशी प्रशिक्षक

ADVERTISEMENT

अथेन्स ऑलिम्पिक खेळांच्या काही आठवडे आधी त्यावेळची संघटना इंडियन हॉकी फेडरेशनने जेऱ्हाड रॅच यांची प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली. जर्मनीचे अनुभवी खेळाडू म्हणून रॅच यांच्याकडे पाहिलं जात. परंतू रॅच यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाला फारसा प्रभाव पाडता आला नाही. अथेन्स ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ सातव्या स्थानावर फेकला गेला. ड्रॅगफ्लिक स्पेशालिस्ट संदीप सिंगचं संघात नसणं त्यावेळी भारताला चांगलंच भोवलं होतं.

ADVERTISEMENT

२) रिक चार्ल्सवर्थ –

२००८ साली रिक चार्ल्सवर्थ यांची भारतीय हॉकी संघाच्या तांत्रिक संचालक पदावर नेमणूक करण्यात आली. चार्ल्सवर्थ यांनी स्वतःहून भारतीय हॉकीसंघासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. २००८ बिजींग ऑलिम्पिकला भारतीय संघ पात्र ठरु शकला नाही, त्यावेळी हॉकी संघटना आणि संघावर चांगलीच टीका झाली. यानंतर संघटनात्मक राजकारण आणि वादामुळे चार्ल्सवर्थ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

३) जोस ब्रासा –

चार्ल्सवर्थ यांच्याप्रमाणे ब्रासा यांची कारकिर्द छोटेखानी ठरली. ब्रासा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हॉकी संघाने २०१० साली आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची कमाई केली, परंतू त्यांनीही यानंतर पायउतार होणं पसंत केलं.

४) मायकल नॉब्ज –

यानंतर भारतीय हॉकी संघाची सूत्र आली ती मायकल नॉब्ज यांच्याकडे. बिजींग ऑलिम्पिकमध्ये संधी हुकल्यानंतर नॉब्ज यांनी भारतीय हॉकी संघाला लंडन ऑलिम्पिकचं तिकीट मिळवून दिलं. परंतू या स्पर्धेतही भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. यानंतर खराब तब्येतीचं कारण देत नॉब्ज यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Olympics: ‘सामन्याआधी कोचने खुर्च्यांवर उभं रहायला सांगितलं’…ग्रॅहम रिड यांची ती युक्ती आणि Tokyo मध्ये जल्लोष

५) पॉल वॅन अस –

पॉल वॅन अस यांनी भारतीय हॉकी संघात काही चांगले तांत्रिक बदल करुन सुधारणा घडवल्या. ज्याचा परिणाम दिसत असताना…हॉकी संघटनेचे प्रमुख नरेंद्र बत्रा यांच्यासोबत झालेल्या वादामुळे त्यांना आपलं पद सोडावं लागलं. यानंतर भारतीय हॉकी संघाची सूत्र रोलांट ओल्टमन्स यांच्याकडे आली.

Tokyo Olympics 2020: ‘तुम्ही जबरदस्त काम केलंय, संपूर्ण देश नाचतोय’, PM Modi यांचा थेट भारतीय हॉकी टीमला फोन!

६) रोलांट ओल्टमन्स –

ओल्टमन्स यांनी भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय मिळवण्याची सवय लावली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. २०१३ साली ओल्टमन्स भारतीय हॉकी संघाचे तांत्रिक संचालक म्हणून काम पाहत होते. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ साखळी फेरीचा अडथळा पार करु शकला तो ओल्टमन्स यांच्या मार्गदर्शनामुळेच…परंतू संघटनात्मक राजकारण ओल्टमन्स यांच्या आडवं आलं.

२०१७ साली हॉकी इंडियाने महिला संघाचे प्रशिक्षक जोर्द मरीन यांना पुरुष संघाची जबाबदारी दिली. जोर्द मरीन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हॉकी संघाने आशिया चषकात गोल्ड मेडल, हॉकी वर्ल्ड लिगमध्ये ब्राँझ मेडल मिळवलं. परंतू २०१८ कॉमनवेल्थ गेम्स आणि सुलतान अझलन शहा कप हॉकीमधलं अपयश मरीन यांना भोवलं. भारतीय हॉकी संघात तरुणांना संधी देण्यात मरीन यांचा मोलाचा वाटा होता. दिलप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद या नवोदीत खेळाडूंना मरीन यांनी संधी दिली.

परंतू महत्वाच्या स्पर्धेतही तरुण खेळाडूंवर जास्त भरवसा दाखवत असल्यामुळे मरीन यांच्या रणनितीवर टीका व्हायला लागली. त्यातच भाषेच्या समस्येमुळे भारतीय वातावरणाशी जुळवून घेण्यात मरीन यांना अडचण यायला लागली. ज्यामुळे हॉकी इंडियाने पुन्हा एकदा मरीन यांना महिला संघाची जबाबदारी दिली.

Tokyo Olympics 2020 : भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक जोर्द मरीन यांचा राजीनामा

७) हरेंद्र सिंग –

मरीन यांच्या बदलीनंतर हॉकी इंडियाने बऱ्याच कालावधीनंतर भारतीय कोचवर विश्वास दाखवला आणि हरेंद्र सिंग यांच्याकडे संघाची जबाबदारी सोपवली. हरेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हॉकी संघाने मधल्या काळात आश्वासक कामगिरी केली. परंतू आशियाई खेळांमध्ये सेमी फायनलमध्ये मलेशियाकडून झालेला पराभव आणि टोकियो ऑलिम्पिकला थेट पात्र होण्याची हुकलेली संधी यामुळे हरेंद्र सिंग यांच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. हॉकी विश्वचषकात हरेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहचला होता, परंतू टोकियोचं तिकीट मिळवण्यासाठी ही बाब पुरेशी नव्हती. ज्यामुळे २०१९ मध्ये हरेंद्र यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

यानंतर भारतीय हॉकी संघ २०१९ चा सुलतान अझलन शहा कप प्रशिक्षकांविना खेळला. हरेंद्र सिंग यांची उचलबांगडी त्यावेळी चांगलीच चर्चेत होती.

८) ग्रॅहम रिड –

यानंतर हॉकी इंडियाने भारतीय संघासाठी ग्रॅहम रिड यांची नेमणूक केली. सुरुवातीला अनेक जणं रिड यांच्या नेमणुकीबद्दल फारसे उत्सुक नव्हते. परंतू संघाची जबाबदारी हातात आल्यानंतर रिड यांनी काही मुलभूत बदल करायला सुरुवात केली. यातला पहिला भाग म्हणून २०१९ पासून भारतीय संघ हॉकी प्रो-लिगमध्ये सहभागी व्हायला लागला. FIH Series Finals, Olympics Qualifiers अशा स्पर्धांमध्ये सहभागी होत रिड यांनी भारतीय संघाला दिग्गज संघांसोबत दोन हात करण्याचा आत्मविश्वास मिळवून दिला. रिड यांच्या या रणनितीचा भारतीय संघाला चांगलाच फायदा झाला.

नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, बेल्जिअम यासारख्या संघाविरुद्ध भारतीय संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरु लागला. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडीअमवर भारतीय हॉकी संघाने प्रो-लिगमध्ये डच संघावर मात केली. वर्ल्ड चॅम्पिअनशीपमध्येही भारतीय हॉकी संघाने बेल्जिअमसारख्या तगड्या संघाचं आव्हान परतवून लावलं होतं. यानंतर ऑस्ट्रेलियालाही भारतीय संघाने बरोबरीत रोखून दाखवण्याची किमया साधली.

कोरोना महामारीच्या काळात सर्व स्पर्धा रद्द झाल्यामुळे भारतीय संघासमोर सराव न होण्याची समस्या होती. परंतू अर्जेंटिनाविरुद्ध सामन्यात भारताने चांगली कामगिरी करुन दाखवली. आकाशदीप सिंग, एस.व्ही.सुनील यासारख्या खेळाडूंना टोकियो ऑलिम्पिक संघात रिड यांनी स्थान दिलं नाही. यावेळी रीड यांच्यावर टीकाही झाली. परंतू आपण निवड केलेल्या संघावर विश्वास ठेवत रिड यांनी भारतीय संघाची मोट बांधून दाखवण्याचं आव्हान पूर्ण करुन दाखवलं.

टोकियोत न्यूझीलंडवर मात करुन भारताने धमाकेदार सुरुवात केली. यानंतर ऑस्ट्रेलियाकडून स्विकारावा लागलेला १-७ हा पराभव भारतीय संघासाठी डोळे उघडणारा होता. परंतू रिड यांच्या मार्गदर्शनाखाली खचून न जाता भारताने चांगलं कमबॅक केलं. आधी स्पेन त्यानंतर अर्जेंटिना, उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनला पराभवाचं पाणी पाजत भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचला. उपांत्य फेरीत बेल्जिअमसमोर भारताची डाळ शिजली नाही…पण कांस्यपदकाच्या लढतीत भारताने अटीतटीच्या लढतीत जर्मनीचं आव्हान परतवून लावत बाजी मारत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं. याआधी कोणत्याही परदेशी प्रशिक्षकाला न जमलेली कामगिरी ग्रॅहम रिड यांनी करुन दाखवली आहे. कधीकाळी ऑस्ट्रेलियाच्या संघाचे खेळाडू असलेल्या रिड यांचं भारतीय हॉकी संघाच्या विजयात मोलाचं योगदान मानलं जात आहे. त्यामुळे आगामी काळासाठी भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदाचा प्रश्न निकाली निघाला आहे असं म्हणायला नक्कीच वाव आहे.

Tokyo Olympics : Chak De India! कोच जोर्द मरीन यांचे ‘ते’ शब्द आणि भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाला धुळ चारली

    follow whatsapp

    ADVERTISEMENT