HBD Sachin Tendulkar : वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा सचिन कांगारुंची झोप उडवतो...

सचिनची ती वादळी खेळी आजही ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मनात कायम
HBD Sachin Tendulkar : वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा सचिन कांगारुंची झोप उडवतो...
फोटो सौजन्य - इंडिया टुडे

क्रिकेट म्हटलं की आजही कोट्यवधी भारतीय फॅन्ससाठी एकच नाव समोर येतं ते म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. आपल्या बहारदार खेळीच्या जोरावर सचिनने २४ वर्षांच्या कारकिर्दीत देशात आणि देशाबाहेर आपले कोट्यवधी चाहते निर्माण केले. क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. ४९ व्या वर्षात पदार्पण केलेल्या सचिनने आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज गोलंदाजांची झोप उडवली होती.

या अनेक खेळींपैकी सचिनने आपल्या वाढदिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली खेळी आजही कट्टर क्रिकेटप्रेमींच्या मनात कायम आहे. १९९८ साली शारजहा येथे झालेल्या कोका कोला कप मध्ये सचिनने कांगारुंची पळता भुई थोडी करत भारताला विजय मिळवून दिला होता. सचिनच्या या खेळीने शेन वॉर्नसारख्या दिग्गज बॉलरचीही झोप उडाली होती.

HBD Sachin Tendulkar : वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा सचिन कांगारुंची झोप उडवतो...
फिटनेसशी तडजोड नाही ! निवृत्तीनंतरही सचिन जिममध्ये गाळतोय घाम

अंतिम सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी २७३ धावांचं आव्हान मिळालं होतं. ज्याचा पाठलाग करताना सचिनने एकहाती किल्ला लढवला. सलामीला फलंदाजीसाठी येताना आधी सौरव गांगुली आणि त्यानंतर कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनसोबत महत्वाची भागीदारी करत सचिनने शारजाहच्या मैदानात चौफेर फटकेबाजी केली. १३१ बॉलमध्ये १२ फोर आणि ३ सिक्स लगावत सचिनने १३४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या एकाही गोलंदाजाची डाळ या सामन्यात सचिनपुढे शिजू शकली नाही. अखेरीस कॅसप्रोविचने सचिनला आऊट केलं होतं.

क्रिकेट विश्वात डेजर्ट स्ट्रॉम नावाने प्रसिद्ध असलेल्या सचिनच्या या खेळीने कांगारुंची झोप उडवली होती. १३४ धावांच्या खेळीसाठी सचिनला सामनावीर आणि संपूर्ण मालिकेत ४३५ धावा आणि २ विकेट घेतल्यामुळे सचिनला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत अनेक वर्ष उलटली तरीही सचिनची ही खेळी आणि त्याच्याबद्दलचं प्रेम आजही फॅन्सच्या मनात कायम आहे.

Related Stories

No stories found.