
श्रीलंकेविरुद्ध मोहाली कसोटी सामन्यात १७५ धावांची खेळी आणि दोन्ही डावांत ९ विकेट घेणाऱ्या रविंद्र जाडेजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आयसीसीच्या क्रमवारीत जाडेजा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहचला आहे.
श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यात केलेल्या कामगिरीच्या जोरावर जाडेजाने वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकलं आहे. जाडेजाने आपल्या क्रमवारीत दोन अंकांनी सुधारणा केली असून तो तिसऱ्या स्थानावरुन थेट दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताच्या रविचंद्रन आश्विनची एका स्थानाने घसरण झाली असून तो दुसऱ्या स्थानावरुन तिसऱ्य़ा स्थानावर घसरला आहे.
दुसरीकडे फलंदाजीत विराट कोहलीच्या स्थानात सुधारणा झाली असून तो पाचव्या स्थानावर पोहचला आहे. कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीत आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकला नाही, त्यामुळे त्याची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने पहिल्या डावातील ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर टॉप १० फलंदाजांच्या यादीत समावेश केला आहे.