Ind vs SL : Team India च्या यंग ब्रिगेडकडून लंकादहन, मालिकेत भारताला विजयी आघाडी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवा टीम इंडियाने दुसऱ्या वन-डे सामन्यात श्रीलंकेवर ३ विकेट राखून मात केली आहे. या विजयासह भारताने ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या २७६ रन्सचा पाठलाग करताना टीम इंडिया दोनवेळा संकटात सापडली होती. परंतू पहिल्यांदा मुंबईकर सूर्यकुमार यादव आणि त्यानंतर दीपक चहरने महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सूर्यकुमार आणि दीपक चहरने वन-डे क्रिकेटमधली पहिली हाफ सेंच्यूरी झळकावत अनुक्रमे ५३ आणि नाबाद ६९ रन्स केल्या.

टॉस जिंकून श्रीलंकेने पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका या सलामीच्या जोडीने श्रीलंकेला चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी ७७ रन्सची पार्टनरशीप केल्यानंतर चहलने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. मिनोद भानुका आणि भानुका राजपक्षा यांना एकाच ओव्हरमध्ये आऊट करत चहलने भारताला सामन्यात कमबॅक करुन दिलं. परंतू फर्नांडो आणि धनंजय डी-सिल्वा जोडीने पुन्हा एकदा भारताचा डाव सावरला.

भुवनेश्वर कुमारने अविष्का फर्नांडोला आऊट करत लंकेची जमलेली जोडी फोडली. फर्नांडोने ५० रन्सची इनिंग खेळली. यानंतर मधल्या फळीत श्रीलंकेकडून चरिथा असलंका आणि चमिका करुणरत्ने यांनी महत्वपूर्ण इनिंग खेळत श्रीलंकेला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. असलंकाने ६५ तर करुणरत्नेने नाबाद ४४ रन्स केल्या. भारताकडून चहल आणि भुवनेश्वर यांनी प्रत्येकी ३-३ तर चहरने दोन विकेट घेत श्रीलंकेला २७५ रन्सवर रोखलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रत्युत्तरादाखल भारताची सुरुवात खराब झाली. पहिल्या मॅचमध्ये बहारदार इनिंग खेळणाऱ्या भारताच्या आघाडीच्या फळीतील बॅट्समनला लवकर आऊट करण्यात श्रीलंकेला यश आलं. पृथ्वी शॉ, शिखर धवन आणि इशान किशन हे फलंदाज लवकर माघारी परतले ज्यामुळे एका क्षणाला भारतीय संघ ३ बाद ६५ अशा खडतर परिस्थितीत अडकला. यानंतर मनिष पांडे आणि सूर्यकुमार यादव जोडीने महत्वपूर्ण भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला.

सूर्यकुमार यादवने महत्वपूर्ण इनिंग खेळताना काही बहारदार चौकार लगावले. वन-डे क्रिकेटमध्ये आपली पहिली हाफ सेंच्युरी झळकावण्यात सूर्यकुमार यशस्वी ठरला. ४४ बॉल्समध्ये ६ फोर लगावत सूर्यकुमारने ५३ रन्स काढल्या. परंतू संदकन आणि शनकाने सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्याला लागोपाठ आऊट करत भारताला पुन्हा एकदा बॅकफूटला ढकललं. कृणाल पांड्याने दीपक चहरच्या साथीने पुन्हा एकदा भागीदारी रचून भारताचं आव्हान कायम राखलं.

ADVERTISEMENT

डी-सिल्वाने कृणाल पांड्याला आऊट करुन भारताच्या अडचणी वाढवल्यानंतर दीपक चहरने सर्व सूत्र आपल्या हाती घेत फटकेबाजीला सुरुवात केली. अखेरच्या पॉवरप्लेमध्ये श्रीलंकन बॉलर्सचा समाचार घेत दीपक चहरने आपली वन-डे क्रिकेटमधली पहिली हाफ सेंच्युरी झळकावली. भुवनेश्वर कुमारनेही दीपक चहरला महत्वाची साथ देत शेवटपर्यंत भारताचं आव्हान कायम राखलं. श्रीलंकेच्या बॉलर्सनी ही जोडी फोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, परंतू त्यांना यश आलं नाही. अखेरीस भारताने २-० च्या फरकाने वन-डे सिरीजमध्ये विजयी आघाडी घेतली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT