२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधून भारतीय हॉकी संघाची माघार

क्वारंटाइनच्या नियमांमध्ये शिथीलता न आल्यामुळे हॉकी इंडियाचा निर्णय
२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधून भारतीय हॉकी संघाची माघार
भारतीय हॉकी संघ आशियाई क्रीडा स्पर्धांवर आपलं लक्ष केंद्रीत करणार आहे.

भारतीय महिला आणि पुरुष हॉकी संघ आगामी २०२२ कॉमनवेल्थ खेळांमध्ये सहभागी होणार नाहीये. हॉकी इंडियाचे अध्यक्ष ग्यानेंद्रो निंगोबम यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांना या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली आहे.

कॉमनवेल्थ खेळांमध्ये सहभागी होण्याऐवजी भारतीय हॉकीसंघ आगामी आशियाई खेळांवर आपलं लक्ष केंद्रीत करणार आहे. आशियाई खेळांमध्ये भारतीय हॉकी संघाने गोल्ड मेडल मिळवलं तर त्यांना आगामी २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. तब्बल ४१ वर्षांनी भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई केली होती. २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकीसंघाने ब्राँझ पदक मिळवलं होतं, तर महिला संघाचं पदक थोड्या फरकाने हुकलं होतं.

२०२२ मध्ये जुलै महिन्याच्या दरम्यान बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा खेळवल्या जाणार असून त्यानंतर ऑगस्ट महिन्यात आशियाई क्रीडा स्पर्धा खेळवल्या जातील. "२०२४ पॅरिस ऑलिम्पिकला प्रवेश मिळवण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धा या महत्वाच्या आहेत. त्यामुळे आमच्यासाठी हीच स्पर्धा महत्वाची आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये जाऊन कोणत्याही खेळाडूला कोरोनाची लागण होऊ देण्याची जोखमी आम्ही घेऊ शकत नाही", असं स्पष्टीकरण हॉकी इंडियाचे अध्यक्ष निंगोबम यांनी दिलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये क्वारंटाइनचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. तसेच भारतातून लसीचे दोन्ही डोस घेऊन आलेल्या व्यक्तींसाठीही इंग्लंडने क्वारंटाइनच्या नियमांमध्ये बदल केला नाही, त्यामुळे हॉकी इंडियाने राष्ट्रकुल स्पर्धांऐवजी आशियाई खेळांना अधिक महत्व देण्याचं ठरवलंय. इंग्लंडच्या ज्युनिअर हॉकी संघाने भुवनेश्वरमध्ये होणाऱ्या ज्युनिअर वर्ल्डकप स्पर्धेतून माघार घेतली आहे. इंग्लंडवरुन आलेल्या व्यक्तींसाठी भारतातही क्वारंटाईनचे नियम कडक करण्यात आल्यामुळे इंग्लंडने स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

No stories found.