IPL 2021 : विराटचा अखेरचा प्रयत्नही निष्फळ, RCB चं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात

कोलकाता नाईट रायडर्सची ४ विकेट राखून RCB वर मात
IPL 2021 : विराटचा अखेरचा प्रयत्नही निष्फळ, RCB चं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात
फोटो सौजन्य - IPL

आपल्या कर्णधारपदाच्या काळात RCB ला विजेतेपद मिळवून देण्याचं विराट कोहलीचं स्वप्न अखेरीस स्वप्नच राहिलं आहे. पहिल्या एलिमीनेटर सामन्यात KKR ने RCB वर ४ विकेटने मात करत स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. विराटने युएईत दाखल झाल्यानंतर यंदाचा हंगाम संपल्यानंतर आपण RCB ची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं.

KKR ला दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीशी दोन हात करावे लागणार आहेत. या सामन्यांतला विजेता अंतिम फेरीत चेन्नईशी दोन हात करेल. RCB ने विजयासाठी दिलेलं १३९ रन्सच आव्हान कोलकात्याने सहज पूर्ण केलं.

पहिल्यांदा फलंदाजी करताना RCB ने डावाची चांगली सुरवात केली. विराट कोहली आणि देवदत पडीक्कल यांनी चांगली सुरुवात करुन दिली. दोन्ही बॅट्समननी चांगली फटकेबाजी केली. लॉकी फर्ग्युसनने पडीक्कलला आऊट करत RCB ला पहिला धक्का दिला. यानंतर RCB चे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. के.एस.भारत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हीलियर्स हे बिनीचे शिलेदार एक-एक करुन KKR च्या जाळ्यात अडकत गेले.

ज्यामुळे निर्धारित ओव्हर्समध्ये RCB चा संघ १३८ रन्सपर्यंत मजल मारु शकला. KKR कडून सुनील नारायण ४ तर लॉकी फर्ग्युसनने २ विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल कोलकाता नाईट रायडर्सने आश्वासक सुरुवात केली. शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यरने सुरेख फटके खेळत संघाला ४१ धावांची पार्टनरशीप करुन दिली. हर्षल पटेलने गिलला आऊट करत KKR ला पहिला धक्का दिला. यानंतर राहुल त्रिपाठीही फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात चहलच्या बॉलिंगवर माघारी परतला. व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणा यांनी तिसऱ्या विकेटसाठी एक छोटेखानी पार्टनरशीप करत KKR चा डाव सावरला. ही जोडी मैदानावर स्थिरावत आहे असं वाटत असतानाच हर्षल पटेलने व्यंकटेश अय्यरला माघारी धाडलं.

यानंतर KKR ने सुनील नारायणला चौथ्या जागावर बढती दिली. सुनील नारायणनेही डॅनिअल ख्रिश्चनच्या बॉलिंगवर चौफेर फटकेबाजी करत सामन्याचं चित्रच पालटलं. नारायणच्या फटकेबाजीमुळे RCB बॅकफूटवर गेलेली असतानाच चहलने नितीश राणाला आणि मोहम्मद सिराजने नारायणला आऊट करत सामन्यात रंगत आणली. अनुभवी दिनेश कार्तिक एक बाजू लावू मैदानात उभा होता, परंतू सिराजने त्यालाही आऊट करत KKR च्या गोटात टेन्शन निर्माण केलं. परंतू कर्णधार ओएन मॉर्गन आणि शाकीब अल हसन यांनी संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in