'कोणाकडेही बोट दाखवणं चांगलं नाही', Virat Kohli च्या पत्रकार परिषदेतील भूमिकेवर कपिल देव नाराज

खरं-खोटं आज न उद्या माहिती पडेलच, पण दौरा सुरु होण्याआधी हा वाद बरा नव्हे - कपिल देव
'कोणाकडेही बोट दाखवणं चांगलं नाही', Virat Kohli च्या पत्रकार परिषदेतील भूमिकेवर कपिल देव नाराज

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निघण्यासाठी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने घेतलेल्या पत्रकार परिषदेवरुन सध्या नवीन वादंग निर्माण झाला आहे. विराटने या पत्रकार परिषदेत थेट बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या विधानाला खोटं ठरवत आपली नाराजी व्यक्त केली. विराटच्या या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चांचे फड रंगत असताना माजी कर्णधार कपिल देव विराटवर नाराज झाले आहेत.

"या घडीला अशा पद्धतीने कोणाकडे बोट दाखवणं चांगलं नाही. दक्षिण आफ्रिका दौरा जवळ आला आहे, त्यामुळे या दौऱ्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं. मी म्हणेन की बोर्डाचा अध्यक्ष हे नक्कीच मोठं पद आहे त्याच पद्धतीने भारतीय संघाचा कर्णधार हे देखील तितकंच जबाबदारीचं आणि महत्वाचं पद आहे. परंतू अशा पद्धतीने एकमेंकाबद्दल वाईट पद्धतीने बोलणं आणि ते ही लोकांसमोर हे काही चांगलं लक्षण नाही." कपिल देव ABP News शी बोलत होते.

विराट कोहलीने पत्रकार परिषदेत आपल्याला कशा पद्धतीने ODI संघाच्या कॅप्टन्सीवरुन हटवण्यात आलं याबद्दल माहिती दिली. तसेच ज्यावेळेला मी टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मला कोणीही असं करु नकोस असं सांगितलं नाही. उलट माझ्या निर्णयाचं स्वागतच केलं गेलं असं म्हणत विराटने गांगुलीला खोटं ठरवलं आहे.

यावेळी बोलत असताना कपिल देव यांनी विराट कोहलीला परिस्थितीवर नियंत्रण मिळवत पहिल्यांदा आपल्या देशाचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. "विराटने परिस्थितीवर नियंत्रण मिळवत सर्वात आधी आपल्या देशाचा विचार करावा. जे काही चुकीचं झालंय त्याबद्दल आज न उद्या माहिती कळेलच परंतू दौऱ्याआधी अशा पद्धतीने वाद तयार करणं माझ्यामते योग्य नाही."

या पत्रकार परिषदेत बोलत असताना विराट कोहलीने आपल्यात आणि रोहित शर्मामध्ये कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलं. यापुढे रोहीत आणि राहुल सरांना माझा पूर्ण पाठींबा असेल असंही विराट म्हणाला. टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना झाली असून या दौऱ्यात दोन्ही संघ ३ कसोटी आणि ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

'कोणाकडेही बोट दाखवणं चांगलं नाही', Virat Kohli च्या पत्रकार परिषदेतील भूमिकेवर कपिल देव नाराज
२०२१ वर्ष ठरलंय Virat साठी अत्यंत खडतर ! या ८ गोष्टी गमावल्या

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in